नम्रता फडणीस - * सद्यस्थितीतील कोरोनाचे संकट हे चीनमुळे उदभवले आहे असं म्हटल जातंय. कोरोना आणि चीनचा थेट संबंध आहे का?-पूर्वी कोरोना चीनमधून आला असं म्हटलं जायचं. कारण अमेरिकेला तेच हवं होतं. कुणाकडून तरी ते आलं असं म्हटलं की आपण त्यातून मुक्त झालो.चीन-अमेरिका मधील व्यापारयुद्ध हे सुरूच आहे. त्यामुळे चीनला अमेरिकेकडून लक्ष्य केलं गेलं. जी 7 ची जी परिषद झाली. त्यामध्ये करारावेळी हा चायनीज व्हायरस आहे असं म्हणा तरच मी स्वाक्षरी करेन अशी भूमिका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली होती. दोन दिवसांपूर्वी सीएनएन वर वृत्त प्रसारित झाले की हा व्हायरस चीनमधून नव्हे तर युरोपमधून आला आहे. त्यामुळे हा व्हायरस चीनमधून आला की नाही हा आता वादाचा मुददा आहे. भारतात देखील चीनविरोधी वातावरण निर्माण झाले ते निरर्थक आहे. चीनने हे केलं असेल याबाबत शक्यता कमी आहे.* भारतात कोरोना मोठ्या प्रमाणावर फैलावण्यामागचं तुमचं निरीक्षण काय?- आज कोरोनाचा 180 देशांना तडाखा बसला आहे. त्या तुलनेत भारतावर फारसा परिणाम झालेला दिसून येत नाहीये. कारण आपण कोरोनाच्या चाचण्याच अधिक केलेल्या नाहीयेत. त्या केल्यानंतर कोरोनाचे संकट अधिक वाढेल असं म्हटलं जातय. ज्यात तथ्य आहे. जर्मनी, साऊथ कोरिया, चीन आणि अमेरिका या देशांनी अशा चाचण्या केल्या आहेत. भारताने अशी पावले अजूनही उचललेली नाहीत.चीनमध्ये डिसेंबर शेवटच्या आठवड्यामध्ये कोरोनाची लागण सुरू झाल्यानंतर भारताने खबरदारी दाखवायला हवी होती पण आपण गाफिल राहिलो. याचा परिणाम काय होईल हे अजून काही दिवसातच कळेल. या चाचण्या झाल्या तर देशात कोरोनाचे पीक येईल. आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर झोपडपट्ट्या आहेत. एका घरात सहा ते आठ लोक राहातात. पाणी नाही, साबण तर दूरची गोष्ट. भारताची परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे.* कोरोनामुळे जगाची अर्थव्यवस्था पूर्णत: ढासळली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेवर याचा काय परिणाम होईल?- कोरोनामुळे दोन महिन्यात संपूर्ण जग ढवळून गेलं आहे. पुढील किमान दोन वर्ष वेगळी जाणार आहेत. 'बीसी' चा अर्थ बदलावा लागणार असून, 'बिफोर कोरोना ' आणि 'आफ्टर कोरोना' असे शब्दप्रयोग आपल्याला करावे लागणार आहेत.राष्ट्रीय सकल उत्पन्न (जीडीपी) हे देशाच्या प्रगतीचं लक्षण मानलं जाऊ नये. या मताचा मी आहे. कारण आपल्याकडे विषमता मोठ्या प्रमाणावर आहे.भारताचा जीडीपीचा दर हा साडेचार टक्क्यापर्यंत आहे असे सरकारने सांगितले होते. राष्ट्रीय सल्लागार आर. सुब्रमण्यम यांच्या मते आपण चुकीचे मोजत आहोत. तो खरंतर अडीच टक्क्यानं कमी केला पाहिजे. म्हणजे तो दोन टक्के इतकाच आहे.दिल्लीच्या अरूणकुमार यांच्या मते तो शून्य ते 1 टक्का इतकाच आहे. ही कोरोनाच्या आधीची स्थिती आहे. जीडीपी नेहमी संघटित आणि असंघटितक्षेत्राच्या उत्पनावर गृहीत धरला जातो. पण असंघटित क्षेत्र नोटाबंदीनंतर अधिकच भरडले गेले. त्यामुळं संघटित बरोबरच असंघटितांचेउत्पन्न देखील तेवढचं आहे असं म्हणणचं चुकीच ठरेल. कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा जीडीपी हा 1 ते 2 टक्क्याने खाली येईल. खऱ्या अर्थाने तो निगेटिव्ह होईल. मे-जून पर्यंत कोरोना आटोक्यात आला तर आर्थिक मंदी येईल पण स्थिती सुधारू शकते. परंतु जर पुढील काही महिने हीच स्थिती राहिली तर1929 सारख्या जागतिक आर्थिक मंदीचा सामना करावा लागेल. लाखो-करोडो लोक बेरोजगार होतील.* कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टींवर लक्ष्य केंद्रित करणे गरजेचे आहे?- आजमितीला कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणावर वाढवल्या पाहिजेत. या लॉकडाऊनच्या काळात बेडस, व्हेंटिलेटर निर्माण करणे, चाचण्या घेणे, विलगीकरण करणे या गोष्टी झाल्या पाहिजेत. नुसतं लॉकडाऊन करून आपण यातून बाहेर पडू शकणार नाही. गेल्या काही दिवसांमध्ये जर हा संसर्ग अधिक वाढला तर चिंतेची स्थिती उदभवेल आणि आरोग्य यंत्रणा पूर्णत: कोलमडेल. हे कटू वास्तव असले तरी लोकांनी घाबरून जाऊ नये.------------------------------------------------------------------------------------------------------------
....तर भारतालाही 1929 सारख्या जागतिक आर्थिक मंदीचा सामना करावा लागेल : अच्युत गोडबोले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 7:00 AM
कोरोनामुळे दोन महिन्यात संपूर्ण जग ढवळून गेलं आहे. पुढील किमान दोन वर्ष वेगळी जाणार आहेत....
ठळक मुद्देकोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा जीडीपी हा 1 ते 2 टक्क्याने खाली येईल. मे-जून पर्यंत कोरोना आटोक्यात आला तर आर्थिक मंदी येईल पण स्थिती सुधारू शकते