- निलेश साळुंखेकोयनानगर- पाटण तालुक्यातील चोपदारवाडी येथील सूरज शेवाळे या पॅरारेजिमेंट कमांडोने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जम्मु काश्मीर मध्ये चार्टर विमानातून तब्बल २२ हजार फूट उडी मारून स्वातंत्र्याचा तिरंगा हवेत फडकवला. सूरज शेवाळे हा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील चोपदारवाडी या गावचा सुपुत्र असून तो २०१७ मध्ये भारतीय सैन्यदलात भरती झाला असून, सध्या तो जम्मू काश्मीर मध्ये सेवा बजावित आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सूरजने हवेत तिरंगा फडकविण्याचा निर्धार केला होता. दरम्यान, सूरज चे प्राथमिक शिक्षण हे गव्हाणवाडी-चोपदारवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले.माध्यमिक शिक्षण मरळी येथील कै वत्सलादेवी देसाई हायस्कूल मध्ये झाले तर उच्चमाध्यमिक शिक्षण पाटण येथील बाळासाहेब देसाई विद्यालयात झाले.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुरज लहानपणापासूनच अत्यंत जिद्दी मेहनती,धाडशी आणि हुशार होता म्हणूनच त्याने सैनिक होउन देशसेवेचे स्वप्न पहिल्याच प्रयत्नात पार पाडले असल्याची प्रतिक्रिया सूरजची आई लता शेवाळे यांनी माहिती दिली.
सुरज यांनी दाखवलेले धाडस व देशप्रेम आम्हा ग्रामस्थासाठी अभिमानास्पद आहे त्याच्या या कामगिरीबद्दल चोपदारवाडी ग्रामस्थाच्यावतीने अभिनंदन पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. - आनंदराव शिंदे, सरपंच, चोपदारवाडी