- प्रा. राजेंद्र चिंचोले
नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी योग्य उमेदवार निवडणे हा नागरी सेवा पूर्व परिक्षेचा उद्देश असतो. पूर्व परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असते. नागरी सेवा परीक्षेला प्रत्येकी २०० गुणांचे सामान्य अध्ययन व सी सॅट हे दोन पेपर असतात. प्रत्येक पेपरचा कालावधी दोन तासांचा असतो. दोनही पेपरच्या प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी भाषेत असतात. कालचाचणी (सी सॅट) या पेपरचे गुण मुख्य परीक्षेच्या निवडणीसाठी गृहित धरले जात नाहीत. मात्र, सीसॅट या पेपरमध्ये उमेदवारांनी २०० पैकी ६६ म्हणजे ३३ टक्के गुण मिळविणे आवश्यक असते. सामान्य अध्ययन या २०० गुणांच्या पेपरमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे मुख्य परीक्षेला प्रवेश दिला जातो. या परीक्षेत निगेटिव्ह मार्किं ग सीस्टिम असून, प्रत्येकी चुकीच्या उत्तरासाठी १/३ एक तृतीयांश (०.३३३३) गुण वजा केले जातात.सामान्य अध्ययन हा नागरी सेवा पूर्व परीक्षेचा पहिला पेपर असून, भारतीय इतिहास, राष्ट्रीय भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, सामाजिक विकास, पर्यावरण, जैवविविधता, हवामान बदल, राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय चालू घडामोडी, विज्ञान, तंत्रज्ञान या विषयांचा यात समावेश असतो. या पेपरमध्ये एकूण १०० प्रश्न प्रत्येकी २ गुणांसाठी विचारले जातात.कलचाचणी (सी सॅट) हा नागरी सेवा पूर्व परीक्षेचा दुसरा पेपर असून, आकलन क्षमता, तर्कशुद्धता, पृथक्करण क्षमता, निर्णय क्षमता, बौद्धिक क्षमता, गणितीय क्षमता, इंग्रजी भाषा क्षमता, समस्या निवारण क्षमता, व्यवस्थापकीय अभिवृत्ती क्षमता परीक्षण या घटकांचा यात समावेश असतो. या पेपरमध्ये एकूण ८० गुण प्रत्येकी २.५ गुणांसाठी विचारले जातात. पहिल्या पेपरमध्ये चांगले गुण मिळूनसुद्धा, कलचाचणी (सी सॅट)मध्ये कट आॅफ गुण (६६ गुण) मिळविण्यात अपयश आल्यामुळे बरेच विद्यार्थी पूर्व परीक्षेत अनुत्तीर्ण होतात.पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी एनसीईआरटी (NCERT) च्या इ. ५ वी ते १२ वी पाठ्यपुस्तकांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. योजना, कुरुक्षेत्र ही मासिके, वर्तमानपत्रे यांचा अभ्यास आवश्यक आहे. सामान्य अध्ययनाच्या अभ्यासासाठी आवश्यक पुस्तके १) ब्रिफ हिस्टरी आॅफ मॉडर्न इंडिया-स्पेक्ट्रम २) बिपीन चंद्रा यांचे मॉडर्न हिस्ट्री ३) लक्ष्मीकांत यांचे इंडियन पॉलिटी ४) रमेशसिंग यांचे इंडियन इकॉनॉमी ५) इकॉनॉमिक सर्वे २०१६ ६) तामिळनाडू पाठ्यपुस्तक मंडळाचे आर्ट अँड कल्चर ७) माजिद हुसेन यांचे जॉग्रफी ८) इंडिया इअर बुक अभ्यासणे गरजेचे आहे. तसेच www.indightiasonindia.com, www.iasbaba.com
www.byjucalsses/ias.com या वेबसाइट उपयुक्त आहेत.कलचाचणी (सी सॅट)च्या अभ्यासासाठी १) टी.एम.एच.चे सॅट म्यॅन्युअल २) अग्रवाल यांचे क्वॉटिटेटिव्ह टेस्ट ३) अरिहंत पब्लिकेशनचे व्हर्बल अँड नॉन व्हर्बल ४) टायरा व कुंदन यांचे सीसॅट ही पुस्तके उपयुक्त ठरतात. पूर्व परीक्षेच्या तयाीसाठी संकल्पनात्मक दृष्टिकोन, विशेष तंत्राचा अवलंब आवश्यक आहे. प्रत्येक उमेदवाराने दोन्ही पेपरमधील आवडीचे विषय, क्षमता, कच्चे दुवे यांचा अभ्यास केला पाहिजे. त्याप्रमाणे, वेळेचे नियोजन, सराव पेपर सोडवणे महत्वाचे असून, तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.