- नितीन बोरसे, नाशिक
भारतीय संस्कृती जगात सर्वोत्तम असून, १७० देशांनी नुकताच योग दिन साजरा करून भारतीय संस्कृतीचा स्वीकार केला, हा हिंदू राष्ट्रासाठी अभिमान आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी येथे केले.समाधान फक्त भारतीय संस्कृतीमध्येच आहे. हे योग साधनेमुळे आता सिद्ध झाले असून, भविष्यात आपली संस्कृती जगासाठी मार्गदर्शक ठरेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. मांगीतुंगी येथील भगवान वृषभदेवांच्या १०८ फूट सर्वाधिक उंच मूर्तीच्या पंचकल्याणक महामस्तकाभिषेक सोहळ्यास प्रारंभ झाला आहे. शनिवारी सर्वतोभद्रमहलमध्ये गर्भ कल्याणक कार्यक्रम झाला. त्यास अमित शाह प्रमुख पाहुणे होते. ज्ञानमती माता यांच्या प्रेरणेने मांगीतुंगी पर्वतावर भगवान वृषभदेवांची सर्वाधिक उंच मूर्ती अखंड पाषाणात निर्माण करणे हा एक अद्भुत चमत्कारच आहे. भारताची निर्मिती कोणी एका राजाने केलेली नाही, तर तो निसर्गनिर्मित देश आहे. भारतीय संस्कृतीचा ध्वज चिरकाळ जगभर उंचावत राहील, असेही ते म्हणाले. भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनीही मनोगत व्यक्त केले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश महाजन, खा. डॉ. भामरे, खा. हरिश्चंद्र चव्हाण आदींना माताजींच्या हस्ते भगवान वृषभदेवांची मूर्ती भेट देण्यात आली. या वेळी ज्ञानमती माता यांनी लिहिलेल्या मांगीतुंगी तीर्थस्थान या पुस्तकाचे प्रकाशन शहांच्या हस्ते झाले.