पुणे : ज्याप्रमाणे हिंदु भारताचे नागरिक आहेत तसे मुस्लिम देखील या देशाचे नागरिक आहेत. मात्र त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष् टीकोन हा अद्याप नकारात्मक स्वरुपाचा आहे. संविधानाची निर्मिती करत असताना अल्पसंख्याक समाज गृहीत धरुन राजकारणात ठराविक प्रमाणात मुस्लिम समाजाला राजकीय आरक्षण देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात सत्ताधारी पक्षात, विरोधी पक्षात किती टक्के मुस्लिम खासदार आहेत, मागील दोन निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून एकही मुस्लिम खासदार निवडून देण्यात आला नाही. त्यामुळे हिंदुत्ववादी भारतीय म्हणून घेण्यापेक्षा संविधानाने सांगितलेले भारतीयत्व जास्त महत्वाचे वाटते. असे मत मजलिस ए इत्तेहदुल मुसलमीन (एमआयएम) या पक्षाचे अध्यक्ष आणि लोकसभेचे खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी व्यक्त केले. पुण्यातील साहित्य आणि कला क्षेत्रातील जाणकार असलेल्या वर्षा चोरडिया आणि सबिना संघवी यांच्या पुढाकाराने ह्यवर्डस काउंटह्ण या शब्दोत्सवाचे आयोजन केले होते. त्यात पत्रकार प्रफुल्ल केतकर यांनी ओवेसी यांची मुलाखत घेतली. वर्डस काउंट या शब्दोत्सवाची संकल्पना ही सुप्रसिद्ध पुरस्कार्थी लेखिका, पटकथाकार आणि स्तंभलेखिका अद्वैता कला यांची असून, शब्दोत्सवाची ही दुसरी आवृती आहे. ओवेसी यांनी धर्मनिरपेक्षता यावर परखडपणे मत व्यक्त केले. ते म्हणाले, आपण स्वत: भारतीय संविधानाने सांगितलेल्या धर्मनिरपेक्षता व भारतीयत्वावर विश्वास ठेवतो. देशातील प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, निवडीच्या स्वातंत्र्याचा अधिकार आहे. त्यावर कुणी बंधने आणत असल्यास त्यांच्याविरोधात उभे राहण्याची ताकद दाखविणे गरजेचे आहे. शेकडो वर्षांपासून गावकुसाबाहेर मरणकळा सोसणाºया दलितांवरील अन्याय अत्याचार अद्याप थांबत नाही. तसेच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपड करावी लागते याकडे लक्ष देण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांना जातीय मतभेद करणे जास्त महत्वाचे वाटते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीयत्व मोडून काढण्याकरिता मनुस्मृतीची होळी करुन नवा आदर्श दलितांसमोर ठेवला. तीच विचारसरणी घेऊन पक्षाची वाटचाल सुरु आहे. तर तुमच्या श्रद्धेपेक्षा माझी श्रद्धा मोठी, ही भूमिका चालणार नाही. राज्य यंत्रणेने कोणत्याही धर्माला पाठिंबा देता कामा नये, तर निरपेक्षच असले पाहिजे. आता सध्या नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांच्यात सर्वाधिक ताकदवान हिंदु कोण? यावरुन रस्सीखेच सुरु आहे. यावरुनच पुढील निवडणुकीची गणिते मांडली जाणार आहेत. दरवेळी बुरखा पध्दती बंद करा, असा सवाल केला जातो. मात्र घुंघट पध्दती देखील हद्दपार करा, असे मात्र कुणी म्हणत नाही. स्त्रियांना काय परिधान करावे हे ठरविण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यावरुन चर्चा केली जाते. आता देशात जे वेगवेगळ्या पध्दतीचे इझम सुरु झाले आहेत त्याविरोधात काम करीत असून केवळ वाराणसीतूनच नव्हे तर कुठल्याही मतदार संघातून निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे ओवेसी यांनी सांगत मोदींवर टीका केली. .....................सरकारने सगळ्यांना नोकऱ्या द्यायच्या कुठून मागील ७० वर्षांपासून देशात रोजगारविषयक प्रश्न आहेत. यापूर्वीच्या सरकारने आश्वासनांची पूर्ती न केल्याने समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आता नोकऱ्याकरिता जो तो सरकारवर अवलंबून आहे. हे चुकीचे असून मुळातच सरकार तरुणांना नोकऱ्या देणार असे म्हणणे त्यांची दिशाभूल करण्यासारखे आहे. चार ते पाच कोटी तरुणांना सरकार नोक-या कुठून देणार ? असा सवाल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)चे राष्ट्रीय आयोजन सचिव सुनील आंबेकर यांनी कार्यक्रमाच्या पूवार्धात झालेल्या मुलाखतीतून व्यक्त केला.