सांगली - मुलाने हट्ट केला म्हणून टाकावू भंगारातील वस्तू जमवून चार चाकी जीप तयार केल्याने सांगलीतील देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार हे चर्चेत आले होते. तसेच त्यांनी तयार केलेली चारचाकीही चर्चेचा विषय ठरली होती. सर्वसामान्यांसह अनेक मंत्री, आमदारांनीही त्यांच्या चारचाकीचे कौतुक केले होते. या सर्वांबरोबरच उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही दत्तात्रय लोहार यांनी तयार केलेल्या चारचाकी जीपचं कौतुक केलं होतं. तसेच या कारच्या बदल्यात त्यांना बोलेरो भेट देण्याची ऑफर दिली होती. दरम्यान, आनंद महिंद्रा यांनी हे वचन पाळलं असून, दत्तात्रय लोहार यांना या बोलेरोची चावी सुपुर्द केली आहे.
दत्तात्रय लोहार यांनी तयार केलेली चारचाकी जीप पाहून आनंद महिंद्रा हेसुद्धा प्रभावित झाले होते. त्यांनी ही चार चाकी आपल्याला देण्याची मागणी दत्तात्रय लोहार यांच्याकडे केली होती. तसेच त्यांना बोलेरो देण्याचंही आश्वासन दिलं होतं त्यानुसार आनंद महिंद्रांनी ही बोलेरो आज सुपुर्द केली. माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील आणि जितेश कदम यांच्या हस्ते या कारच्या चाव्या दत्तात्रय लोहार यांना सुपूर्द केल्या.
जीपसारखा आकार, रिक्षाची चाके, हिरोहोंडाचं इंजिन आणि शेतातील इंजनाची इंधनाची टाकी अशा वस्तू जमवून त्यांनी ही रिक्षापेक्षाही लहान असलेली चार आसनी कार तयार केली आहे. मुलाने हट्ट केल्याने आपल्याला गाडी तयार करण्याची आपल्याला प्रेरणा मिळाल्याचे ते सांगतात. मुलाने कारचा हट्ट धरला होता. मात्र नवी किंवा सेकंड हँड कार घेणे परवडणारे नसल्याने त्यांनी स्वत:च कार तयार करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी एकेक पार्ट गोळा करून त्याआधारे ही कार तयार केली होती.