Imtiaz Jaleel on Indian Muslims : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध विषय गाजत आहेत. सुरुवातीला महाराष्ट्रातील गुन्हेगारीचे वाढलेले प्रमाण हा विषय चर्चेत होता. त्यानंतर औरंगजेबाची कबर आणि इतर घटना घडल्या. तशातच नागपुरात रात्रीच्या वेळी दोन गटात राडा झाला. यावरून अनेक घटना घडल्या. तेव्हापासून या घटनांचे तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर आज दंगल ते औरंगजेब या विविध विषयांवर एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले.
"महाराष्ट्रातील पत्रकारांनी बाहेरच्या प्रगत देशांमध्ये जाऊन तेथील पत्रकारिता बघावी, त्यातून काहीतरी शिकावे. त्या लोकांना प्रगती व विकासाचे वार्तांकन करायची इच्छा असते. पण आपल्या महाराष्ट्रात लोकांचा असा विचार असतो की, ४०० वर्षांपूर्वी काय झालं होतं? त्यांनी किती क्रूरता केली याचा हिशेब इम्तियाज जलीलकडून कसा काय घेतला जाऊ शकतो. मी इतिहासकार किंवा रिसर्च स्कॉलर नाही. मला असे प्रश्न विचारले जातात तेव्हा वाईट वाटते. कारण मी खासदार होतो, आमदार होतो पण तुम्ही मला मुसलमानांचा नेता म्हणून प्रश्न विचारता. मी सगळ्यांचा आमदार - खासदार होतो, एका विशिष्ट जातीधर्माचा लोकप्रतिनीधी नव्हतो. जेव्हा मला केवळ मुस्लीम या नात्याने काहीतरी विचारले जाते, तेव्हा मी सर्वांना देशाच्या मुसलमानांच्या वतीने सांगू इच्छितो की, कोणताही मुलसमान आपला संबंध मुघलांशी जोडत नाही. मी पण जोडत नाही. आमचं काहीही देणं-घेणं नाही," असे इम्तियाज जलील एबीपीच्या कार्यक्रमात म्हणाले.
"राजा लोकं होते, ते लढले, त्यांच्या समस्या होत्या त्या ४०० वर्षांपूर्वीचा होत्या. त्याचं आता काय करायचं आहे. मला फडणवीसांना विचारायचे आहे की तुम्हाला यातून काय मिळते? तुम्हाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. जर तुमचीच लोकं तुम्हाला टार्गेट करण्यासाठी असं काही करत असतील तर त्याची गरज नाही. आता कबरीचा विषय काढून काय उपयोग काय? मी इतर धर्मांचा आदर करतो, तुम्ही आमच्या धर्माचा आदर करा. स्टेजवर तर जाऊदे पण विधानसभेत हल्ली चुकीची विधाने केली जात आहेत. ही बाब खूप वाईट आहे," अशा शब्दांत जलील यांनी नाराजी व्यक्त केली.