लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘‘लष्करातील कुठल्याही एका दलाच्या बळावर युद्ध जिंकणे शक्य नाही. यासाठी तिन्ही दलांची एकत्रित कामगिरी आवश्यक असते. तिन्ही दलाच्या एकत्रित कामगिरीमुळेच हे शक्य आहे. प्रशांत महासागार ते अॅटलांटिक महासागरापर्यंत भारतील नौदलाचा दबदबा आहे. आधुनिकतेद्वारे नौदल अधिक सक्षम बनविणार,’’ असे नौदलप्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांनी सांगितले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३२ व्या दीक्षांत समारंभानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. लांबा म्हणाले, ‘‘गल्फ आॅफ ऐडन, प्रशांत महासागर, तसेच अॅटलांटिक महासागरात भारतीय नौदलाचा मुक्त संचार आहे. २६/११ सारख्या दहशतवादी हल्ल्यांना तोंड देण्यासाठी नौदल सक्षम आहे. कुठल्याही परिस्थितीसाठी नौदल सज्ज आहे.’’ भविष्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास केवळ एका दलाच्या ताकदीवर ते जिंकता येणार नाही. यासाठी तिन्ही दलाचे एकत्रित प्रयत्न हवेत. यासाठीच्या तिन्ही दलाची एकत्रित अशी नवीन कमान होणे आवश्यक आहे. शासकीय पातळीवर असे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय तंत्रज्ञान आणि स्वदेशी जहाजांच्या निर्मितीला नौदलाने सुरुवातीपासूनच प्राधान्य दिले आहे. आतापर्यंत २०० जहाजांची निर्मिती करण्यात आली आहे. ४१ जहाजांचे काम सुरू आहे. यात पाणबुड्यांचाही समावेश आहे. देशी तंत्रज्ञानाला प्राधान्य देत मेक इन इंडियाच्या योजनेनुसार देशातील उद्योगांच्या सहकार्याने नव्या जहाजांच्या उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. आयएनएस विराट नौदलातून निवृत्त झाली आहे़ विक्रांत २ च्या बांधणीचे काम सुरू आहे. विराटचे म्युझियम बनवण्याबाबत कुठलाच प्रस्ताव आलेला नाही. तो आल्यावरच पुढील निर्णय घेतला जाईल, असेही लांबा म्हणाले.
महासागरात भारतीय नौदलाचाच दबदबा
By admin | Published: May 31, 2017 1:20 AM