- जमीर काझी, मुंबई
सोशल मीडियाच्या गैरवापराच्या घटना वाढत असल्या तरी त्याचा विधायक वापरही होऊ शकतो, याचा प्रत्यय कर्नाटकातील अकबर बादशहा या तरुणाबाबत घडलेल्या घटनेतून आला आहे. नोकरीच्या निमित्ताने सौदी अरेबियात गेल्या १४ महिन्यांपासून मालकाकडून फसवणूक झालेल्या या तरुणाला लवकरच भारतीय दूतावासाकडून स्वदेशात पाठविले जाणार आहे. आपल्यावरील अन्यायाचे मोबाइलवर शूटिंग करून सोशल मीडियावरून व्हायरल केलेल्या व्हिडीओने त्याचा भारतातील परतीचा मार्ग निश्चित केला आहे. आपली फसवणूक आणि भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या दुर्लक्षाबाबतची कैफियत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यापर्यंत पोहोचावी, यासाठी व्हिडीओ क्लिप शेअर करण्याचे आवाहन त्याने केले होते. त्याची ही क्लिप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व सौदीतील भारतीय राजदूत अहमद जावेद यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर युद्धपातळीवर त्याचा शोध घेण्यात आला. प्रस्तुत प्रतिनिधीने ती क्लिप जावेद यांना ‘व्हाट्सअॅप’वर पाठविली होती. त्याची दखल घेत त्यांनी पुढील कार्यवाही केली. कर्नाटकातील सागर शहरातील अकबर बादशहा गेल्या वर्षी जुलैमध्ये सौदीतील नजरान शहरात घरकामासाठी गेला होता. - पगाराबाबत मालक टोलवाटोलवी करीत असे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने अकबरने भारतात परत जाण्यासाठी पासपोर्टची मागणी केली. त्यावर त्याला ५ हजार रियाल दिले तरच परत जाता येईल, असे सांगून धमकावले. त्याला घरात डांबून त्याची उपासमार करू लागला. - अखेर अकबरने एका मित्राच्या साहाय्याने आपल्यावरील अन्यायाची मोबाइलवर व्हिडीओ क्लिप बनवून गावाकडील एका मित्राला मोबाइलवर पाठविली. ती क्लिप सौदीतील राजदूत अहमद जावेद यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी त्याची दखल घेत अधिकाऱ्यांना अकबरचा शोध घेण्याची सूचना केली. त्यानंतर नजरान येथे त्याची भेट घेत अधिकाऱ्यांनी संबंधिताकडून त्याचे पासपोर्ट व अन्य पेपर घेतले. - गेल्या आठवड्यात अकबरने कशीबशी सुटका करून घेत जेद्दाह येथील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांची भेट घेत आपला पासपोर्ट मिळवून देण्याची विनंती केली. त्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी रकमेची मागणी केली. अकबरने नकार देत पैसे नसल्याने दोन दिवसांपासून उपाशी असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी ‘या कामात तुझी काहीही मदत करू शकत नाही, तू परत मालकाकडे जा, मुदत संपल्यानंतर भारतात पाठविले जाईल, तुझे काम करण्यास आम्ही बांधील नाही’, असे दरडावत हुसकावून लावले. अकबरचा शोध घेऊन तो काम करीत असलेल्या संबंधिताकडून त्याचे पासपोर्ट व अन्य महत्त्वाचे दस्तावेज ताब्यात घेण्यात आले आहेत. कराराप्रमाणे त्याचे थकीत वेतन मिळवून देण्यात आले. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याने उद्या गुरूवारी त्याला सौदीतून बंगळूरू येथे पाठविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित मालकावर कार्यवाही केली जाणार आहे. - अहमद जावेद (सौदी अरेबियातील भारतीय राजदूत)