मुंबई - विकासाची खोटी स्वप्नं दाखवत सत्तेत आलेल्या मोदी सरकारची कामगिरी कोणत्याच क्षेत्रात उल्लेखनीय झालेली नसून सर्वच क्षेत्रात घसरण होत आहे. अर्थव्यवस्था, जीडीपी, रुपयाच्या घसरणीनंतर आता जागतिक भूक निर्देशांकातही भारताची घसरण झाली आहे. जगातील ११६ देशांच्या यादीत भारत १०१ व्या स्थानावर आहे. ही घसरण मोदी सरकारचे प्रचंड अपयश दर्शवणारी आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत (Congress Sachin Sawant) यांनी केली आहे.
सावंत यांनी अच्छे दिनाचे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारने देशाला अधिकाधिक कुपोषित ठेवले आहे. २०१३ साली भारताचा ६३ वा क्रमांक होता तो आज १०१ झाला आहे. २०१२ ला २८.८ असलेले गुण २०२१ ला २७.५ झाले आहेत. यातही आश्चर्याची बाब अशी की भारताचे शेजारी देश पाकिस्तान, नेपाळ व बांगलादेश हे सातत्याने भारताच्या पुढे आहेत. CHILD WASTING म्हणजे ५ वर्षांखालील अत्यंत कुपोषित मुलांच्या श्रेणीत गेली ५ वर्षे भारत जगात सर्वात मागे आहे. केवळ छाती बडवत गमजा मारुन व योजनांची नावे बदलून काही होत नाही. तर त्याकरिता योग्य नीती, नियोजन, सुयोग्य अंमलबजावणी व इच्छाशक्ती लागते असं म्हटलं आहे.
"मिड- डे मीलचे नाव पीएम पोषण केले पण गेल्या सात वर्षांत जनतेचे शोषण वाढवले आहे त्याचे काय?"
‘मिड- डे मील’चे नाव ‘पीएम पोषण’ केले पण गेल्या सात वर्षांत जनतेचे शोषण वाढवले आहे त्याचे काय? असा सवाल विचारुन. विकासाच्या पोकळ गप्पा मारणारे मोदी सरकार या भूक निर्देशांकातही सपशेल नापास झाले आहे असे सावंत म्हणाले. कोरोनाची परिस्थिती व्यवस्थित हाताळता आली नाही. त्यात लाखो लोकांची रोजगार गेले, हातावरचे काम असणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले, त्यात वाढती महागाई व मोदी सरकारच्या पोकळ योजना यामुळे भूक निर्देशाकांत होत असलेली घरसण थांबवता आलेली नाही. ही चिंतेची बाब असून स्वतः च विश्वगुरु म्हणवून मिरवणाऱ्यांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आतातरी याकडे गांभिर्याने लक्ष देतील अशी अपेक्षा करुयात असेही सावंत म्हणाले.