सांगली : अवकाश संशोधनामध्ये अमेरिका, रशियाप्रमाणेच भारताचे योगदानही महत्त्वाचे ठरत आहे, असे गौरवोद्गार ‘नासा’तील सायन्स मिशनच्या संचालिका, शास्त्रज्ञ डॉ. मधुलिका गुहाथकुरता यांनी सोमवारी येथे काढले. या क्षेत्रातील महिलांचे योगदान लक्षणीय ठरत आहे, हेदेखील त्यांनी यावेळी अधोरेखीत केले. नासा, इस्त्रो व इतर आंतरराष्ट्रीय अवकाश संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. मधुलिका बोलत होत्या. ‘नासा’चे ज्येष्ठ शास्त्रज्ञ व संचालक डॉ. नात गोपालस्वामी यावेळी उपस्थित होते. ही कार्यशाळा आयोजित करण्याचा मान कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाला मिळाला आहे.मधुलिका पुढे म्हणाल्या की, अवकाश संशोधनातील सकारात्मक बदलामुळे मूलभूत आणि आवश्यक प्रगती साधण्यात भारताला यश मिळत आहे. या क्षेत्रात होणारे बदल महत्त्वाचे ठरत असून, त्याचा स्वीकार करीत संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांचीही संख्या वाढत आहे. संशोधन क्षेत्रातील उपक्रम वाढीसाठी ही कार्यशाळा उपयोगी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.‘नासा’चे ज्येष्ठ संचालक डॉ. नात गोपालस्वामी यांनी कार्यशाळेमागील उद्देश स्पष्ट केला. जगभरातील अवकाश संशोधन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या वैज्ञानिकांना नवीन माहिती व्हावी, यासाठी ‘स्कोस्टेप’ या संस्थेची १९६६ ला स्थापना करण्यात आली. या संस्थेकडून जगभरात कार्यशाळा घेण्यात येतात. नवीन विद्यार्थी, संशोधकांना ही कार्यशाळा निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असेही गोपालस्वामी म्हणाले.भारतात प्रथमच होत असलेल्या या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी जगभरातील १२ देशांतील विद्यार्थी, संशोधक सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)
अवकाश संशोधनात भारताचे योगदान महत्त्वाचे
By admin | Published: November 08, 2016 4:41 AM