ठाणे : अमेरिकेत कॉल करून फसवणूक तसेच खंडणी उकळणाऱ्या मीरा रोड येथील कॉल सेंटरवर छापे घालून ठाणे पोलिसांनी सील ठोकलेल्या सात कॉल सेंटरमधील कारवायांनी परदेशात भारताची बदनामी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.मीरा रोडमधील डेल्टा टॉवरच्या सातव्या मजल्यावर वेगवेगळ्या लोकांकडून कॉल सेंटर चालविले जात होते. येथील प्रशिक्षित कर्मचारी अमेरिकन नागरिकांना फोन करून विमा पॉलिसी विक्री तसेच सरेंडर करून रक्कम परत देण्याचे आमिष दाखवत रकमा गोळा करीत होते. तसेच परदेशी ग्राहकांच्या बँक खात्यांची माहिती मिळवून पैसे लंपास करीत असत. काहींच्या खात्यावरून तर आॅनलाइन शॉपिंगही केली जात होती. अनेक कॉल सेंटरवरून कर गोळा करण्याची धमकी देत रकमेची वसुलीही केली जायची. या कॉलसेंटरमधून अमेरिकन नागरिकांना व्हीओआयपी (व्हॉइस ओवर इंटरनेट पोर्टल)वरून कॉल केला जायचा. अमेरिकन इंटर्नल रेव्हेन्यू आॅफिसर असल्याची बतावणी करीत अनेकांना कर चुकविल्याचे सांगत खटला दाखल करण्याचीही धमकी दिली जायची. दंडापोटी १० हजार डॉलर्सची मागणी करून नंतर कमी रकमेवर तडजोड करून रक्कम टार्गेट गिफ्ट कार्डद्वारे वसूल करण्याचा सपाटा या सेंटरमधून सुरू होता. (प्रतिनिधी)
कोट्यवधींची फसवणूक-मीरा रोड येथील कॉल सेंटरवरून सुमारे सात हजार परदेशी नागरिकांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले असले तरी हा आकडा काही लाखांमध्ये असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. फसवणुकीतून या टोळ्यांनी लुटलेली रक्कम कोट्यवधींंच्या घरात आहे.फसवणूक आणि सदोष मनुष्यवधही-मीरा रोड येथील अशाच एका कॉलमुळे एक वयोवृद्ध महिला चांगलीच धास्तावली. तिलाही या तोतया अधिकाऱ्याने छापा टाकण्याची धमकी दिली होती. या कॉलचा धसका घेतल्याने तिचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहितीही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली आहे. आता ही महिला कोण आणि तिला कॉल करणारा तो ‘महाभाग’ कोण, याचीही पडताळणी केली जात आहे. यात तथ्य आढळल्यास संबंधित कॉल करणाऱ्यावर आयटी अॅक्ट, फसवणुकीच्या कलमांसह सदोष मनुष्यवधाचाही गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अनिवासी भारतीयांची प्रतिमा मलिनसातत्याने भारतातून येणाऱ्या कॉलची अमेरिकनांना सवयच झाली होती.काही चलाख अमेरिकन नागरिकांनी शब्दोच्चारावरून हे कॉल भारतातूनच येत असल्याचे ताडले होते. असे कॉल येताच त्यांना ते ‘यू फ्रॉड इंडियन’, ‘डोन्ट कॉल मी अगेन’ अशा भाषेत सुनावून ते फोन कट करीत होते. त्यामुळे अमेरिकेतील अनिवासी भारतीयांनाही तेथील स्थानिक त्याच नजरेने पाहू लागले होते.