पुणे : जागतिक दर्जाची संरक्षण सामुग्री वाजवी दरामध्ये भारताकडून बनविली जात आहे. जगाच्या क्षितिजावर संरक्षण सामुग्रीचे उत्पादन करणारा देश म्हणून भारत पुढे येतोय असे प्रतिपादन लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी केले. औंध मिलिटरी सेंटर येथे आयोजित भारत व १७ आफ्रिकन देशातील सैनिकांच्या संयुक्त लष्करी सरावाचा समारोप बुधवारी झाला. यावेळी बिपीन रावत बोलत होते. दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट सतींदर कुमार सैनी यावेळी उपस्थित होते. संयुक्त लष्करी सरावामध्ये १८० देशांनी सहभाग घेतला. या सरावामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाºया विविध देशांतील सैन्य अधिकाºयांचा बिपीन रावत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. बिपीन रावत म्हणाले, भारत आणि आफ्रिकन देशांची देशाची विकासाची भागीदारी आहे. ही केवळ सुरूवात आहे, भविष्यातही ते सुरू राहील. आफ्रिकन देशांना आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य करण्यासाठी भारताने लक्ष केंद्रीत केले आहे. भारत व आफ्रिकन देशांनी वसाहतवादी साम्राज्यांशी लढा दिला आहे. दोन्ही देशांचे भविष्य उज्ज्वल असणार आहे. जागतिक शांततेमध्ये भारताने नेहमी महत्वाची भूमिका बजावली आहे. आफ्रिकन देशांतील अशांतता आदी बाबींमध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतता मोहीमेमध्ये भारताकडून भरीव सहकार्य केले जात आहे. काँगोमधील शांती सेनेमध्ये भारताचा सर्वात मोठा सहभाग होता भारताने मित्र देशांमधील अनेक सैनिक, अधिकाऱ्यांना लष्करी प्रशिक्षण दिले आहे. भारताचे मित्र देशांशी लष्करी सहकार्य केवळ या प्रशिक्षणापुरतेच मर्यादीत नाही असे रावत यांनी सांगितले.संयुक्त युध्द सरावामध्ये प्रामुख्याने भुसुरूंग निकामी करण्याच्या सरावावर भर देण्यात आला. एकमेकांची सर्वोत्तम कार्यपध्दती शिकून घेण्यात आली. संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतता मोहीमेचे काम कसे चालते, त्याचे नियम, संघटन, कार्यपध्दती आदी या शिबिरामध्ये समजून घेण्यात आली. सहभागी झालेल्या सर्व देशांमधील सैनिकांनी यामध्ये चांगले प्रदर्शन केले. अशा संयुक्त युध्द सरावांचे सातत्याने आयोजन केले पाहिजे. लष्करी आणि विकासात्मक संबंध वाढविण्यासाठी ते उपयोगी पडतील असे रावत यांनी स्पष्ट केले.
...........
भुसुरूंग निकामी करण्याची विविध तंत्र केले आत्मसातभारत व १७ आफ्रिकन देशांच्या संयुक्त युध्द सरावामध्ये प्रामुख्याने भुसुरूंग निकामी करण्याची विविध तंत्रे आत्मसात करण्यावर भर देण्यात आला. एकमेकांच्या सर्वोत्तम कार्यपध्दतीचे आदान-प्रदान यावेळी करण्यात आले.
मोदींची घोषणेची प्रतिक्षा अन् लष्करप्रमुखांना येण्यास विलंबसंयुक्त युध्द सरावाचा समारोप झाल्यानंतर यामध्ये सहभागी झालेल्या सैनिकांना लष्करप्रमुख बिपीन रावत मार्गदर्शन करणार होते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पावणे बाराच्या सुमारास देशाला उद्देशून भाषण करणार असल्याचे व्टिटरवरून जाहीर केले. विविध वृत्त वाहिन्यांवरून लष्कराशी संबंधित मोठी घोषणा मोदी करणार असल्याचे सांगितले जाऊ लागले. त्यानंतर बराच वेळ झाला तरी लष्करप्रमुख कार्यक्रमस्थळी आले नाहीत. त्यामुळे नेमके काय झाले असावे याबाबत युध्द सरावाच्या ठिकाणी उपस्थित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये तर्कवितर्कांना उधाण आले. मात्र थोडयाच वेळात मोदींनी अंतराळातील कामगिरी घोषणा केली अन लष्करप्रमुखही कार्यक्रमस्थळी आले अन् या सगळया तर्कवितर्कांवर पडदा पडला.