नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी अलीकडे चिथावणीखोर वक्तव्ये करीत आहेत. अशा वक्तव्यांद्वारे ते देशातील वातावरण बिघडवण्याचे काम करीत आहेत. दुसरीकडे केंद्र सरकार संविधानात बदल करण्याचे कटकारस्थान करीत आहे, असा आरोप करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी संघ परिवार व भाजपावर नेम साधला. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांची सोमवारी नागपुरात जाहीर सभा आहे. सभेच्या तयारीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण म्हणाले, सरसंघचालक मोहन भागवत आरक्षणात बदल करण्याची भाषा करीत आहे. केंद्र सरकारच्या जाहिरातीतून करण्यात येत असलेले वेगळ्या स्वरूपाचे लिखाण संविधानाच्या विरोधात आहे. परंतु संविधानाचे संरक्षण व्हावे, यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे. आम्ही संविधानात बदल करू देणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.पाणीटंचाईमुळे राज्यात स्फोटक परिस्थिती निर्माण होत आहे. लातूर भागातील जलसाठा संपणार आहे. याची अगोदरच जाणीव असूनही राज्य सरकारने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. उलट माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर ते टीका करीत आहेत. परंतु ही वेळ दुष्काळग्र्रस्तांना दिलासा देण्याची असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अखिल भारतीय कॉंगे्रस समितीचे सचिव बाला बच्चन, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
संघामुळे देशातील वातावरण बिघडले
By admin | Published: April 11, 2016 2:33 AM