ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - हेरगिरीच्या कामामध्ये कितीही थरार, उत्कंठा आणि आव्हान असले तरी, जीवाला नेहमी जोखीम लागून राहिलेली असते. देशांतर्गत माहिती काढण असो किंवा देशाबाहेरची गुप्तहेराच्या जीवाला नेहमीच धोका असतो. पण हे सर्व माहित असूनही तिचा गुप्तहेर बनण्याचा निर्णय पक्का होता. आपल्या लक्ष्यापासून अजिबात विचलित न होता तिने हेरगिरीच्या क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटवला. आज ती भारतातील पहिली महिला गुप्तहेर म्हणून ओळखली जाते. तिचे नाव आहे रजनी पंडित. विशेष कौतुकाची बाब म्हणजे पहिली महिला गुप्तहेर बनण्याचा मान एका मराठी मुलीकडे जातो.
30 जुलै 1960 रोजी रजनी पंडित यांचा जन्म मुंबईत झाला. रुपारेल कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हेरगिरीलाच करीयर बनवले. महाविद्यालयात असताना मुलींची अकारण छेड काढणारे तरुण, वृद्धांची होणार अवहेलना, आडदांडपणा, गुंडगिरी अशा समाजकंटकांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी गुप्तहेर बनण्याचा निर्णय घेतला. रजनीने आपल्या आई-वडिलांना हा निर्णय सांगिल्यानंतर त्यांनी तिला प्रोत्साहनच दिले. लग्न करुन विवाहीत आयुष्यात आणखी एका कुटुंबाला धोक्यात घालू नये हा विचार करुन त्या अविवाहीत राहिल्या.
समाजातील धार्मिक तेढ, पती-पत्नींच्या मनातील संशयाचे भूत अशा प्रश्नांची उकल त्यांनी केली. कधी मोलकरीण बनून त्यांनी रहस्यभेद केला. जिवावर बेतणा-या प्रसंगातही त्यांनी चार्तुयाने मात केली. भारतात तसेच ऑस्ट्रेलिया, युके, दुबई, न्यूझीलंडमधील विविध वाहिन्यांनी त्यांच्यावर माहितीपट बनवले. आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणा-या रजनीताईंना मनापासून सलाम.