ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २२ - जगात भारताची प्रतिष्ठा वाढत असून अनेक देश आता भारताशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यास उत्सुक आहेत. दोन वर्षांपूर्वी देशात निराशेचं वातावरण होतं, मात्र आता उत्साहाचे वातावरण असून काही तरी चांगलं घडेल अशी आशा आता निर्माण झाल्याचे सांगत सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी सरकारच्या कामाचे कौतुक केले. मात्र सर्वांगिण विकासासाठी केवळ सरकारवर अवलंबून राहता येणार नाही. सरकारमुळेच देशाची प्रगती होते असे नव्हे, त्यासाठी जनतेनेही सहभागी व्हायला हवे आणि परंपरेने मिळालेली अर्थव्यवस्था सुधारण्यास वेळ लागणारच, असे खडे बोल त्यांनी विरोधकांना सुनावले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज ९० वा वर्धापनदिन असून रेशीमबागेत विजयादशमीनिमिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सरसंघचालक बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संघाच्या गणवेशात कार्यक्रमाला हजेरी लावली.
इतर देशांशी भारताचे चांगले संबंध निर्माण झाले आहेत, देशात उत्साहाचे वातावरण आहे. जगाला भारताकडून नेतृत्वाची अपेक्षा आहे. सरकार स्व:तच्या हितासोबत विश्वाच्या हिताचाही विचार करत आहे. जगात कोणतीही आपत्ती आली तर आपण त्यांच्या मदतीसाठी धावून जातो असे सांगत त्यांनी भूकंपग्रस्त नेपाळला भारताने केलेल्या मदतीचा उल्लेख करत सरकारचे कौतुक केले. स्वच्छ भारत, जन-धन, डिजीटल इंडिया, गॅस सबसिडी सोडणे अशा विविध योजना चांगल्या असून, त्या अमलात आणण्यासाठी थोडा वेळ लागेल, असे ते म्हणाले.
केवळ भौतिक विकास उपयोगी नसून अध्यात्मिक विकासही महत्वाचा आहे. आपली भारतीय संस्कृती समृद्ध आहे, परदेशी संस्कृतीचे अंधानुकरण करण्याची गरज नाही असा सल्ला त्यांनी दिला. धर्मातूनच त्याग आणि संयमाची शक्ती मिळते, असे मतही त्यांनी व्यक्त केले. विविधतेत एकता शिकवणाऱ्या हिंदू संस्कृतीमुळेच आपला देश अखंड असल्याचे सांगत छोट्या-मोठ्या घटनांनी आपल्या संस्कृतीला, अखंडतेला धक्का बसत नाही असे सांगत त्यांनी दादरी हत्याकांडावर अप्रत्यक्षपणे सूचक भाष्य केले.
वाढत्या लोकसंख्येनुसार कार्यवाही केली पाहिजे असे सांगत कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी लोकभावना बनवावी लागेल असेही ते म्हणाले. देशातील निवडणूक व्यवस्था बदलण्याची गरज आहे. निवडणूक व्यवस्था भ्रष्टाचाराचे कुरण बनायला नको, लोकप्रतिनिधी ख-या अर्थाने लोकांसाठी निवडून येतील अशी व्यवस्था हवी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
सीमारेषेवर पाकिस्तानची शत्रूबुद्धी आणि चीनच्या विस्तारबुद्धीचा आपल्याला सामना करावा लागत आहे. सामेपलीकडे इसिस सारख्या दहशतवादी संघटनाचा धोका असतानाच आपल्यासमोर देशांर्गत दहशतवादाचेही संकट उभे आहे. अशावेळी शाती, सुरक्षा व सुशासन ठेवण्यात सरकारची खूप महत्वाची भूमिका असते असे भागवत यावेळी म्हणाले.
देशाच्या विकासासाठी एकता आणि संवाद आवश्यक आहेत, मतभेद असले तरी ते चर्चेने सोडवले पाहिजेत. शासन, प्रशासन आणि समाज एकत्र आला तरच भाग्य बदलू शकतं, असे सरसंघचालकांनी सांगितले.