ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 9 - पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याच्या प्रकारावर देशाचे गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी जोरदार टीका केली आहे. भारतासमोर उभे राहण्याची पाकिस्तानची क्षमता नाही. पाकिस्तानला योग्य ते प्रत्युत्तर देण्यात येईल व एकाच्या बदल्यात दहा हेच भारताचे धोरण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.नागपूर रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. प्रत्यक्षात पाकिस्तान हा कमकुवत देश आहे. भारताच्या कुरापती काढण्याची पाकिस्तानची अगोदरपासूनची सवय आहे. मात्र त्यांचे भ्याड हल्ले आता सहन केले जाणार नाहीत. त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यात येईल. यापुढे आपण हल्ले सहन करायचे नाहीत व मार खायचा नाही, हे सैन्यदलाला सांगण्यात आले आहे, असे अहिर यांनी सांगितले. इराकने पाकिस्तानवर कारवाई करण्याची भाषा वापरली आहे. इराकच्या धोरणावर आपण समाधानी असून पाकिस्तान दहशतवादी कृत्यांना खतपाणी घालत असल्याचे जगासमोर येत आहे. पाकला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळेल, असेदेखील ते म्हणाले.नक्षलवादावर विकास हेच उत्तरछत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून हिंसक कारवाया वाढत आहेत. याबाबत हंसराज अहिर यांना विचारणा केली असता नक्षलवाद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. फार काळ नक्षलवाद्यांच्या कारवाया चालणार नाहीत. पुढे असले हल्ले होऊ नयेत याबाबत सुरक्षादलांना योग्य ते निर्देश देण्यात आले आहेत. नक्षलग्रस्त भागात तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येईल व त्यांना शस्त्रसामुग्रीची कमतरता भासणार नाही, याचीदेखील काळजी घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नक्षलवाद मूळापासून नष्ट करायचा असेल तर आदिवासी भागात विकास होणे आवश्यक आहे. विकास हेच नक्षलवादावर उत्तर आहे, असे ते म्हणाले.
एकाच्या बदल्यात दहा हेच भारताचे धोरण- हंसराज अहिर
By admin | Published: May 09, 2017 8:37 PM