आधी त्यांचे बिघडू द्या, मग आमचे ठरवू; पृथ्वीराज चव्हाण यांचे सूचक संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 10:33 PM2019-11-06T22:33:05+5:302019-11-06T22:34:27+5:30
राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटण्याची चिन्हे दिसत नाही आहेत. एकीकडे शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर अडली आहे.
सातारा - राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटण्याची चिन्हे दिसत नाही आहेत. एकीकडे शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर अडली आहे. तर भाजपा मुख्यमंत्रिपद आणि महत्त्वाची खाती न सोडण्यावर ठाम आहे. त्यामुळे सत्तास्थापनेचे घोडे अडले आहे. दुसरीकडे भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देतील. अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हण यांनी सूचक संकेत दिले आहेत. ''आधी त्यांचे बिघडू द्या, मग आमचे ठरवू,'' असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भाजपा आणि शिवसेना महायुतीला बहुमत मिळालेले आहे. आता आधी त्यांचे बिघडून द्या, त्यानंतर सरकार स्थापनेबाबत आमचे काय ते ठरवू. राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन होण्याची गरज आहे.''
दरम्यान, राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा कायम असतानाच भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात शिवसेना-भाजपा आणि मित्रपक्षांच्या महायुतीचेच सरकार येणार असल्याचा पुनरुच्चार केला. तसेच सरकार स्थापनेबाबत माहिती देण्यासाठी आपण आणि चंद्रकांत पाटील राज्यपालांना भेटण्यासाठी गुरुवारी जाणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
राज्यात उदभवलेल्या पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कोअर कमितीची बैठक आज पुन्हा एकदा झाली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की,''विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये शिवसेना, भजपा आणि मित्रपक्षांच्या महायुतीला जनादेश मिळाला आहे. या जनादेशाचा आदर व्हावा ही भाजपाची पहिल्यापासूनची भूमिका आहे. राज्यात महायुतीचंच सरकार स्थापन व्हावं, यासाठी भाजपाचं पुढील प्रत्येक पाऊल पडेल. तसेच कुणीही कितीही प्रयत्न केले तरी राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होईल.''