मुंबई : केंद्र सरकारच्या युवक कार्य आणि क्रीडा विभागाच्या वतीने नुकताच राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाचा सर्वोच्च इंदिरा गांधी राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये महराष्ट्राच्या डॉ. राजेश करपे, सीमा गावडे व विनायक राजगुरु यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. १९ नोव्हेंबरला राष्ट्रपती भवनातील दरबार सभागृहामध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात येईल.दरवर्षी केंद्र सरकारच्या वतीने एनएसएसच्या या सर्वोच्च पुरस्काराची घोषणा होते. उत्कृष्ट विद्यापीठ, कार्यक्रम अधिकारी किंवा समन्वयक आणि विद्यार्थी अशा तीन विभागांमध्ये हा पुरस्कार दिला जातो. यंदा महाराष्ट्राने कार्यक्रम अधिकारी आणि विद्यार्थी गटात पुरस्कार पटकावला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मराठवाडा विद्यापीठ - औरंगाबाद येथील डॉ. करपे यांनी एनएसएस कार्यक्रम अधिकारी म्हणून तीन वर्षांत केलेल्या उपक्रमांची दखल घेत, केंद्र सरकारने त्यांची निवड केली. त्याचवेळी शिवाजी विद्यापीठच्या (कोल्हापूर) सीमा गावडे आणि केटीएचएम कॉलेज, नाशिकच्या (पुणे विद्यापीठ) विनायक राजगुरु यांची विद्यार्थी म्हणून केंद्र सरकारने दखल घेतली आहे. या तिन्ही विजेत्यांनी राष्ट्रीय स्तरावर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे आपल्या कार्याची माहिती दिली. आॅगस्टमध्ये मला एनएसएसमध्ये कार्यक्रम अधिकारी म्हणून तीन वर्ष पूर्ण झाली. विद्यार्थी म्हणून एनएसएसशी जोडला गेलो. आजपर्यंत एनएसएसच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा हा गौरव आहे. हा पुरस्कार केवळ माझा नसून, एनएसएस स्वयंसेवक आणि माझ्या विद्यापीठाचा आहे. त्यांच्याशिवाय हे यश शक्य नव्हते. - डॉ. राजेश करपेएनएसएसच्या या सर्वोच्च पुरस्कारचा आनंद आहेच, शिवाय आता जबाबदारीही वाढली आहे. माझे विद्यापीठ, कॉलेज, शिक्षक आणि मित्र - मैत्रिणी यांच्या सहकार्यामुळे हे यश मिळाले. एनएसएसच्या माध्यमातून समाजकार्य करण्याचा माझा प्रयत्न असेल.- विनायक राजगुरूकेंद्र व राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे महाराष्ट्र एनएसएसने पार पाडल्या आहेत. दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार पटकावण्याची परंपरा यंदाही कायम राखल्याचा आनंद आहे. राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे वर्षभर केलेल्या उपक्रमांची पोचपावती आहे.- अतुल साळुंखे, राज्य संपर्क आणि विशेष कार्यक्रम अधिकारी, एनएसएस, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्राच्या तिघांना इंदिरा गांधी पुरस्कार जाहीर
By admin | Published: November 02, 2015 3:04 AM