- यदु जोशी, नागपूरइंदिरा घरकूल योजना, रमाई योजनेला फाटा देऊन दारिद्र्य रेषेखालील बेघरांसाठी आता पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावे घरकूल जागा खरेदी अर्थसाहाय्य योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दीनदयाळ उपाध्याय हे जनसंघाचे नेते होते. ते एकात्म मानवतावादाचे प्रणेते मानले जातात.सध्या केंद्र सरकारच्या इंदिरा घरकूल योजनेंतर्गत घराच्या जागा खरेदीसाठी २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. ग्रामीण भागातील बेघरांपैकी ज्यांच्याकडे स्वत:ची जागा नाही, असे कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मात्र, ग्रामीण भागातील जागेचे दर विचारात घेता, २० हजार रुपयांमध्ये घरकुलासाठी जागा खरेदी करण्यास अपेक्षित प्रतिसादच मिळाला नाही. जागेअभावी इंदिरा घरकूल योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित असलेल्या लाभार्र्थींची संख्या दोन लाखांच्या वर आहे. त्यामुळे ही योजना अपयशी ठरली. सामाजिक न्याय विभागाची रमाई घरकूल योजना, आदिवासी विकास विभागाची शबरी घरकूल योजना या राज्य पुरस्कृत योजनेमध्येदेखील, मोठ्या प्रमाणात पात्र लाभार्र्थींना केवळ जागेअभावी घरकूल योजनेचा लाभ देता येत नाही. घरकूल बांधकामासाठी स्वत:ची जागा नसलेल्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना जागा खरेदीसाठी अतिरिक्त अर्थसाहाय्य देण्याची योजना म्हणून, आता पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकूल जागा खरेदी अर्थसाहाय्य योजना राबविली जाईल. ही योजना इंदिरा, रमाई व शबरी घरकूल योजनेतील दारिद्र्य रेषेखालील घरकूलपात्र, परंतु घरकूल बांधकामासाठी जागा नसलेल्या लाभधारकांना लागू राहील.
इंदिरा, रमाई घरकूल योजनेला फाटा!
By admin | Published: December 18, 2015 1:18 AM