विशेष प्रतिनिधी मुंबई : दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याविषयी इयत्ता नववीच्या इतिहासाच्या पुस्तकात अवमानकारक मजकूर असल्याच्या मुद्यावरून आज विधानसभेत विरोधी पक्ष सदस्यांनी एकच गदारोळ केला. हा मजकूर तातडीने काढून टाकण्याची मागणी त्यांनी केली; पण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नंतर केलेल्या निवेदनात तसे कोणतेही आश्वासन दिले नाही.प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी हा मुद्दा उचलला. त्यांनी तसेच राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी या विषयावर जनतेत संतप्त प्रतिक्रिया असल्याचे नमूद केले.थोर नेत्यांची बदनामी करण्याचा सरकारचा अजेंडा आहे का? असा सवाल विखे यांनी केला. त्यावर, अशी मानहानी करण्याची सरकारची भूमिका नसल्याचे स्पष्ट करीत याविषयी शिक्षणमंत्री सभागृहात निवेदन करतील. आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याविषयी पाठ्यपुस्तक मंडळाला कळविले जाईल, असे सांसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. त्याने समाधान न झालेले विरोधी पक्षांचे सदस्य गोंधळ घालू लागले. गदारोळात अध्यक्षांनी कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब केले. कामकाज सुरू झाल्यानंतर अजित पवार यांनी आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्यावर आरोप केले आणि त्यावरून गोंधळाला सुरुवात झाली.विनोद तावडे यांनी यासंबंधी निवेदन करताना सांगितले की, इयत्ता नववीच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात स्वातंत्र्यपूर्व काळाबरोबरच स्वातंत्र्यानंतरच्या सन २००० पर्यंतच्या ठळक घटनांचाही समावेश करण्यात आला आहे. या काळात विविध प्रधानमंत्र्यांच्या कार्यकाळातील निर्णय आणि घटनांचाही समावेश आहे. त्या अनुषंगाने तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या काळातील घटनांच्या उल्लेखाच्या अनुषंगाने बोफोर्स प्रकरणामुळे सरकार गेल्याचे म्हटले आहे. हा इतिहास सन २००० सालापर्यंतचाच असल्याने आणि राजीव गांधी यांच्या निर्दोषत्वावर त्यानंतर निर्णय झाल्याने त्याबाबत अभ्यासक्रमात उल्लेख आलेला नाही.यास्तव अशा घटनांमुळे कोणाचीही बदनामी होऊ नये, यासाठी काळजी घेण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात येतील, असे तावडे म्हणाले.
इंदिराजी, राजीव गांधींच्या बदनामीचे तीव्र पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 12:50 AM