सोलापूर : भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होण्यासाठी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाचा व्यापक विचार करुन अणुचाचणी करुन आपले वर्चस्व दाखवले. यामुळेच आज चीन आणि पाक एकत्र आल्यानंतरही गप्प राहिले आहेत. याचे श्रेय इंदिराजींच्या अण्वस्त्रसिद्धतेच्या धोरणाला असल्याचे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केले.सोलापूर शहर-जिल्हा काँग्रेस कमिटीने रविवारी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्ष समारंभाचे आयोजन केले होते. त्यात प्रतिभाताई बोलत होत्या. इंदिरा गांधींच्या रुपाने एक कणखर नेतृत्व देशाला मिळाले. पूर्वी अमेरिकेतून धान्य मागवले जायचे. अन्न धान्याच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण झाला पाहिजे या एकाच भूमिकेतून त्यांनी एकसूत्री कार्यक्रम राबवला. त्यांच्या व्यापक दृष्टीकोनामुळेच आपला देश आज स्वयंपूर्ण आहे, किंबहुना आज भारत एक पाऊल पुढे आहे. देशातला सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेऊन त्यांनी राष्टÑीयकृत बँकांची निर्मिती केली. देशाला सुरक्षित करण्यासाठी मोठे कार्य केले. पंडित नेहरुंनी बाळगलेल्या स्वप्नांची पूर्तता करुन देशाला आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख केला. मोहन प्रकाश यांनी मोदी आणि अमित शहा या जोडगोळीच्या राजकारणावर चौफेर टीका केली. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, इंदिराजींनी देशाला नवी दिशा दिली. हरितक्रांतीचे स्वप्न पाहिले नाही तर ते पूर्णत्वाकडे नेण्याचे काम त्यांनी केले.एकीकडे राज्यातील सर्व काँग्रेस नेत्यांनी या कार्यक्रमास हजेरी लावलेली असताना नारायण राणे यांची अनुपस्थिती जाणवत होती. राणे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा असून अलीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणे यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले होते. शिवाय, रविवारी भाजपाध्यक्ष अमित शाह मुंबईत होते. त्यांच्या मुंबई दौ-यात राणे हे शाह यांची भेट घेणार असल्याची चर्चा दिवसभर रंगली होती.
इंदिराजींमुळेच देश सुरक्षेत स्वयंपूर्ण - प्रतिभाताई पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 6:17 AM