इंदिरानगर : जागतिक हास्य दिनानिमित्त इंदिरानगर परिसरातील रस्त्यावरून काढण्यात आलेली हास्यदिंडीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. दिंडीतील सहभागी हास्य क्लबच्या सदस्यांच्या हास्याचा वेगळाच अनुभव इंदिरानगरवासीयांनी घेतला. नाशिक जिल्हा हास्ययोग समन्वय समिती, इंदिरानगर विभाग व युनिक ग्रुप राजीवनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हास्य दिनानिमित्त युनिक मैदानावर हास्य दिन साजरा करण्यात आला. नगरसेवक सतीश सोनवणे, सचिन कुलकर्णी यांच्या हस्ते जॉगिंग ट्रॅक येथे श्रीफळ वाढवून हास्यदिंडीला प्रारंभ झाला. यावेळी दिंडीतील सदस्यांनी नमस्ते, बलून, मिरची, तू तू मैं मैं यांसह विविध हास्यप्रयोग करून उपस्थितांना हास्यात सहभागी करून घेतले. जॉगिंग ट्रॅक येथून हास्यदिंडीला सुरुवात होऊन शास्त्रीनगर, गजानन महाराज मंदिर, मोदकेश्वर चौक, रथचक्र चौक, आत्मविश्वास सोसायटी, गुरुकृपा सोसायटी, नाना-नानी पार्क येथे दिंडीची सांगता झाली. दिंडीमध्ये मुक्त, निर्मल, पवित्र, स्वच्छंद, विठ्ठल-रुक्मिणी, साई श्रीराम, सप्तशृंगी, रामनगर, राधेगोविंद, प्रसन्न, विजय, गोदावरी, ओम गुरुदेव, श्रद्धानंद, ओमनगर, आनंद, स्वयंसिद्धी, नंदिनी, श्रीकृष्ण, भद्रकाली, महात्मा फुले, गुडमॉर्निंग यांसह अनेक हास्य क्लब सहभागी झाले होते. दिंडीत सहभागी सदस्यांनी झाशीची राणी, लोकमान्य टिळक, विदुषक आदिंची वेशभूषा साकार केली होती. तसेच सायंकाळी राणेनगर येथील युनिक मैदानावर हास्य क्लबच्या वतीने हास्याचे प्रयोगही करण्यात आले. यावेळी नगरसेवक सतीश सोनवणे, कवी नरेश महाजन, नगरसेवक संजय चव्हाण, अर्चना जाधव, वंदना बिरारी, यशवंत निकुळे, अदिती वाघमारे, सुषमा दुगड आदि उपस्थित होते. फोटो : ०४पीएचएमए७०इंदिरानगर येथील हास्यदिंडीच्या उद्घाटनप्रसंगी नगरसेवक सतीश सोनवणे, सचिन कुलकर्णी. ०४पीएचएमए७२हास्यदिंडीमध्ये विविध वेशभूषा करून सहभागी झालेले ज्येष्ठ सदस्य.
इंदिरानगरला हास्यदिंडीने वेधले लक्ष
By admin | Published: May 05, 2014 1:13 PM