मुंबई - सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फेसबुक आणि टिकटॉकवरुन हा व्हिडीओ व्हायरल होत असून गर्भलिंग निदान निवडीसंदर्भातील महाराजांच्या किर्तनातील वक्तव्याला आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे, पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम 22चे उल्लंघन केल्याप्रकरणी इंदुरीकरांची चौकशी करण्यात येणार आहे.
‘मराठी कीर्तन व्हिडिओ’ या यूट्यूब चॅनेलद्वारे इंदुरीकर महाराजांचे किर्तन सोशल मीडियात प्रसिद्ध केले जातात. या व्हिडीओवरील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये, ‘सम तिथीला स्त्री संग झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’, असे महाराज म्हटले आहेत. तसेच, स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी व खानदान मातीत मिळवणारी मुलं होतात. टायमिंग हुकला का क्वालिटी खराब... असे विधान इंदुरीकर यांनी 4 जानेवारी रोजी यूट्युब चॅनेलवर अपलोड केलेल्या कीर्तनाच्या व्हिडिओमध्ये केले आहे. तसेच, पुराणकाळातील एक दाखलाही महाराजांनी यावेळी दिला होता.
याप्रकरणी अहमदनगरमधील पीसीपीएनडीटी सल्लागार समितीने बैठकीत घेऊन गर्भलिंगनिदान जाहीरात किंवा प्रचार केल्याबाबत महाराजांची चौकशी करण्याची तयारी दर्शवली आहे. पीसीपीएनडीटी कायदा कलम 22 अंतर्गत गर्भलिंग निदान निवडीबाबत जाहिरातीस बंदी आहे. छापील पत्रक, संवाद अगर एसएमस, फोन, इंटरनेटद्वारे गर्भलिंग निदान आणि निवडीची जहिरात करण्यास बंदी आहे. कलम 22(3), कलम 22 चा भंग झाल्यास संबंधितास तीन वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा आहे.