मुंबई : महाराष्ट्राचे तुकडे करणे म्हणजे मराठी संस्कृतीचे, मराठी भाषेचे तुकडे करण्यासारखे आहे. जन्म दिलेल्या आईचे तुकडे करण्यात काय पराक्रम आहे, असा सवाल करीत मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मूठभर विदर्भवाल्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत आहेत, अशी टीका केली.संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील १०६ हुतात्म्यांच्या कुटुंबीयांच्या गौरव सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी आचार्य अत्रे यांचे नातू राजेंद्र पै, सचिन इटकर यांच्या उपस्थितीत हुतात्म्यांचे कुटुंबीय दत्ताजी घाडीगावकर, रंजना कणसे, सुलक्षणा गिरकर, परेश पवार, लक्ष्मण थोरात यांचा सत्कार करण्यात आला. काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेतर्फे या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.आ. राणे म्हणाले, कुणीही महाराष्ट्र तोडण्याची भाषा करू नये. त्यांना गुंडाळायला आम्हाला वेळ लागणार नाही. महाराष्ट्राच्या विद्यमान व भावी पिढीला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा इतिहास कळण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)
‘वेगळ्या विदर्भाला मुख्यमंत्र्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा’
By admin | Published: May 09, 2016 3:37 AM