मुंबई : भारत-पाकिस्तानच्या सीमारेषेवरील पुंछ गावात लालबागच्या राजाच्या प्रतिकृतीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. प्राचीन शिव-दुर्गा भैरव मंदिर ट्रस्टचे पुंछ जिल्ह्याचे उपाध्यक्ष किरणबाला सोमराज ईशर, हे येथे श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करणार आहेत. २६ आॅगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजता वांद्रे टर्मिनसहून स्वराज एक्स्प्रेसने ही मूर्ती रवाना होणार असून, तब्बल २ हजार किलोमीटरचे अंतर कापत २७ आॅगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता जम्मू रेल्वे स्थानकावर पोहोचेल. विद्याविहार पश्चिमेकडील नवपाड्यातील श्रीसिद्धिविनायक गणेशमूर्ती कार्यशाळेत मूर्तिकार विक्रांत पांढरे यांनी लालबागच्या राजाची ही प्रतिकृती साकारली आहे. पुंछ येथील गणेशोत्सवाचे हे सहावे वर्ष आहे. जम्मू-काश्मीर येथील वातावरण तणावपूर्ण असून, येथे शांतता नांदावी म्हणून श्रीगणेशाच्या चरणी प्रार्थना करण्यात येणार आहे. जम्मू रेल्वे स्थानकावर श्रींची मूर्ती दाखल झाल्यानंतर, ट्रस्टचे अध्यक्ष विभीषण शर्मा, संजीव शर्मा, देवराज शर्मा यांच्याकडून गणेशभक्तांचे स्वागत केले जाईल. त्यानंतर, जवानांच्या मदतीने येथून ही मूर्ती ट्रकद्वारे तीनशे किलोमीटरवरील पुंछ गावात नेण्यात येईल. ५ सप्टेंबर रोजी श्रीगणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल. श्रीगणेशाची दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर, अनंत चतुर्थीच्या दिवशी बेताड नदीत मूर्तीचे विसर्जन केले जाईल. (प्रतिनिधी)
भारत-पाकच्या सीमेवर होणार श्रींची प्रतिष्ठापना
By admin | Published: August 26, 2016 1:54 AM