इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना कोल्हापूरमध्ये येऊन मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका व्यक्तीने कॉल करून धमकी दिल्याची माहिती इंद्रजीत सावंत यांनी दिली. हा व्यक्ती नागपूर येथील प्रशांत कोरटकर असल्याचेही त्यांनी सांगितले. जी रेकॉर्डिंग सावंत यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे, त्यात धमकी देणारा व्यक्ती अर्वाच्य शिवीगाळ करत घरी येऊन मारण्याची धमकी देत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ब्राह्मणांबद्दल द्वेष पसरवत असल्याचा आरोप करत या व्यक्तीने इंद्रजीत सावंतांना शिवीगाळ केली. प्रशांत कोरटकर असं नाव या व्यक्तीने संभाषणादरम्यान सांगितले. त्याचबरोबर माझे नाव गुगलवर शोध. ब्राह्मणांना हलक्यात घेऊन नको. ब्राह्मणांची ओकात दाखवून देऊ. जिथे बोलवशील तिथे येऊ, येतो. तुझ्या घरात येऊन मारेन, असे धमकी देणारी व्यक्ती म्हणत आहे.
इंद्रजीत सावंत काय बोलले?
"मा.मुख्यमंत्री यांचे नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक परशूरामी ब्राम्हण धमक्या देत आहे. मला अशा धमक्या नवीन नाहित पण या हरामखोरांचे शिवरायांच्या बद्दलचे विचार किती घाणेरडे आहेत,यांच्या पोटात श्री शिव छत्रपतीं बद्दल काय विष भरलेले आहे हे झोपलेल्या मराठा बहुजनांना समजावे म्हणून हे रेकार्डिंग व्हायरल करत आहे. या कोरटकर नावाच्या नागपूरच्या भिक्षूकालाच काय यांच्या बापाला ही हा शिवरायांचा मावळा घाबरत नाही", असे इंद्रजीत सावंत यांनी म्हटले आहे.
प्रशांत कोरटकर काय म्हणाले?
"मला सकाळी कॉल आले की, माझ्या आवाजात कुणीतरी सावंत यांना धमकी दिली आहे. पहिली गोष्ट तर २५ वर्षांपासून पत्रकारिता करतो. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज असो, इतिहास असो याचा मी अभ्यास केलेला आहे. यापूर्वी इतकी जबाबदार पत्रकारिता केल्यानंतर असं मी कुणाला फोनवर धमकी देईल?", असे प्रशांत कोरटकर म्हणाले.
"माझं नाव वापरून कुणीतरी फोन केला. अशा प्रकारची धमकी देण्याचा प्रश्नच नाहीये. बाष्कळ धमकी देण्याचा माझा पायंडा नाही. त्यांनी ती गोष्ट माझ्याशी शहानिशा करून टाकली असती, तर बरं झालं असतं. तुम्हाला माहितीये की हल्ली एआय करून आवाजाचे मार्फिंग केले जाते. माझ्याबद्दल द्वेष बाळगणाऱ्याने हा केलेला प्रकार आहे. मी पोलिसांत तक्रार आहे की, कोणी माझ्या आवाजाची नक्कल केली आहे", असे प्रशांत कोरटकर यांनी सांगितले.