मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीला पुन्हा एकदा जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेले दोन दिवस तिचा ताप उतरत नसल्यामुळे बुधवारी दुपारी चारच्या सुमारास तिला जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती भायखळा महिला कारागृह प्रशासनाकडून मिळाली. डेंग्यूची प्राथमिक लक्षणे आढळून आल्यामुळे इंद्राणीला रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय तुरुंग प्रशासनाने घेतला. इंद्राणीच्या तपासणीसाठी जे.जे.तून एक डॉक्टर पाठवण्यात आला होता, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिला रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तिच्या काही तपासण्या केल्या जाणार असून, त्यांचे अहवाल उद्या (गुरुवार) येतील, अशी माहिती जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. इंद्राणीला गेले दोन दिवस ताप भरला आहे. तापामुळे प्लेटलेट्स ६४ हजारांपर्यंत कमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे तिला डेंग्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. डेंग्यूच्या तापामुळे प्लेटलेट्स कमी झाल्या असल्यास, तिला किमान चार ते पाच दिवस रुग्णालयात ठेवावे लागण्याची शक्यता आहे. २ आॅक्टोबर रोजीही इंद्राणीला बेशुद्धावस्थेत जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (प्रतिनिधी)
इंद्राणी मुखर्जी पुन्हा जे.जे.त दाखल
By admin | Published: October 29, 2015 12:55 AM