मुंबई : इंग्रजी वृत्तवाहिनीत मोठ्या पदावर कार्यरत राहिलेल्या इंद्राणी मुखर्जीला खार पोलिसांनी मंगळवारी बहिणीच्या हत्येप्र्रकरणी अटक केली. या कारवाईने रात्री उशिरा मुंबईत मोठी खळबळ उडवून दिली. तीन वर्षांपूर्वी अंत्यत रहस्यमय पद्धतीने झालेल्या या हत्याकांडात इंद्राणी आणि तिचा ड्रायव्हर श्याम रॉय यांचा सहभाग असल्याचे भक्कम पुरावे हाती येताच खार पोलिसांनी ही कारवाई केली. हत्या झालेल्या इंद्राणीच्या बहिणीचे शीना बोहरा नाव होते. संपत्ती व आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून इंद्राणीने तिचा काटा काढल्याची प्राथमिक माहिती खार पोलिसांना मिळाली आहे.दरम्यान, इंद्राणी व रॉय यांना कोणताही गाजावाजा न करता खार पोलिसांनी दुपारी वांद्रे न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना ३१ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत धाडले. इंद्राणी ही इंग्रजी वृत्तवाहिनीत मोठे नाव असलेल्या पीटर मुखर्जी यांची दुसरी पत्नी आहे. २००२मध्ये त्यांचा विवाह झाला होता. पीटर हे स्टार टीव्हीचे सीईओ होते. तेव्हा इंद्राणी तेथील एचआर विभागात मोठ्या हुद्द्यावर कार्यरत होती. २००९मध्ये मुखर्जी दाम्पत्याने आयएनएक्स वाहिनी सुरू केली होती. या हाय प्रोफाइल महिलेवरील कारवाईमुळे प्रसारमाध्यमांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. २०१२ मध्ये शीनाचे अपहरण करून तिचा अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला होता. हल्लेखोरांनी तिला मारल्यानंतर रायगडमधील घनदाट व निर्जन झाडीत तिचा मृतदेह पुरला होता. शीना बेपत्ता झाल्याबाबत कसलीही तक्रार नोंदविण्यात आलेली नव्हती. सुरुवातीला मृतदेह मिळाल्यानंतर अनोळखी महिलेच्या खुनाचा गुन्हा रायगड पोलिसांनी दाखल करून घेतला. शीनाच्या निकटवर्तीयांकडून हे कृत्य झाल्याचा पोलिसांना संशय होता़ त्यादृष्टीने तपास करण्यात येत होता. खार पोलिसांना एका खबऱ्याने इंद्राणीचा ड्रायव्हर श्याम याचा एका मोठ्या गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती दिली. त्यानंतर गेले काही दिवस खार पोलिसांचे विशेष पथक श्यामवर नजर ठेवून होते. दोन दिवसांपूर्वी त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने इंद्राणीसाठी शीनाची हत्या केल्याची, संपूर्ण हत्याकांडात सहभागी असल्याची कबुली दिली. त्यानंतर या हत्याकांडात इंद्राणीचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी तिला चौकशीसाठी बोलावले. सुमारे तीनेक तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी तिला अटक केली व लगोलग न्यायालयातही हजर केले. (प्रतिनिधी)इंद्राणी मुखर्जीच्या अटकेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून अत्यंत गुप्तता बाळगण्यात येत आहे. याबाबत रायगडचे पोलीसप्रमुख सुवेझ हक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मुंबई पोलिसांनी समन्वय ठेवून ही कारवाई केली आहे. त्यांना त्याबाबत आवश्यक असलेली सर्व माहिती देण्यात आली असून, अधिक काही सांगण्यास नकार दिला.
हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जी गजाआड
By admin | Published: August 26, 2015 5:18 AM