ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - शीना बोरा हत्येप्रकरणी अटकेत असलेली मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने भायखळा कारागृहात गेल्या आठवड्यात एका कैद्याची कारागृह अधिका-यांनी हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. इतकंच नाही तर आपल्याकडे याप्रकरणी महत्वाची माहिती असल्याचंही तिने म्हटलं आहे. याप्रकरणी आपल्याला कारागृह अधिका-यांकडून धमक्या मिळत असून माहिती उघड केल्यास लैंगिक अत्याचार करण्याची धमकी देत असल्याचा दावा तिने केला आहे.
इंद्राणी मुखर्जीने न्यायालयामध्ये याप्रकरणी साक्ष देण्याची तयारी दर्शवली आहे. पीडित महिला कैद्याच्या साथीदारांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये महिला पोलीस अधिका-याने लैंगिक अत्याचार केल्याचा दावा केला आहे. महिलेच्या गुप्तांगावर हल्ला करत अमानुष अत्याचार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
Prison riot: Indrani Mukerjea"s lawyer files application in Spl CBI Court, Mumbai saying she has been assaulted by Byculla jail authorities.— ANI (@ANI_news) June 27, 2017
हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ज्या सहा कारागृह अधिका-यांचं निलंबन करण्यात आलं आहे त्यामध्ये या महिला अधिका-याचाही समावेश आहे. इंद्राणीच्या वकिलाने तिला कारागृह अधिका-यांकडून जबर मारहाण झाली असल्याचा दावा न्यायालयात केला आहे. इंद्राणी मुखर्जीच्या वकिलाने न्यायालयात माहिती दिली असता उद्या म्हणजेच बुधवारी इंद्राणीला न्यायालयात हजर करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
Prison riot: Special CBI court,Mumbai has ordered to produce Indrani Mukerjea in court tomorrow— ANI (@ANI_news) June 27, 2017
कारागृह अधिका-यांनी इंद्राणी मुखर्जीविरोधात जमाव भडकवण्याचा आणि त्यात सहभागी होण्याचा आरोप लावला आहे. शनिवारी महिला कैद्याच्या मृत्यूनंतर काही महिला कैद्यांनी छतावर धाव घेतली होती, तर काहींनी वृत्तपत्र जाळली होती.
शीना बोरा हत्या प्रकरणी सप्टेंबर 2015 पासून इंद्राणी मुखर्जी भायखळा कारागृहात आहे. 25 ऑगस्ट 2015 रोजी तिला हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. तिचा पती पीटर मुखर्जीला तीन महिन्यानंतर अटक झाली होती. त्यांच्या मालकीचं असलेलं टीव्ही नेटवर्क 2009 मध्ये विकलं होतं.
शीना बोराचा मृतदेह रायगडच्या जंगलात सापडला होता. तोपर्यंत तिचा मृत्यू होऊन तीन वर्ष झाली होती. इंद्राणी मुखर्जीच्या ड्रायव्हरला एका वेगळ्या प्रकरणात अटक झाली असता शीना बोरा हत्याकांड समोर आला होता.
काय आहे प्रकरण -
भायखळा कारागृहात शुक्रवारी कैदी महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर इतर कैद्यांनी शनिवारी तोडफोड करीत तब्बल पाच ते सहा तास गोंधळ घातला. यात काही पोलीस जखमी झाले. त्यामुळे कारागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणारी मंजुळा गोविंद शेट्ट्ये (३२) ही शुक्रवारी रात्री बराकीमध्ये चक्कर येऊन कोसळली. तिला तत्काळ जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. जेलरने मारहाण केल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप अन्य महिला कैद्यांनी केला आहे.