मुंबई : शीना बोरा हत्याप्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीने तपासासाठी आवाजाच्या नमुन्यांची चाचणी घेण्यास सीबीआयला मंगळवारी परवानगी दिली. ‘मी चाचणीसाठी माझी परवानगी देते,’ असे मुखर्जीने दंडाधिकाऱ्यांना सांगितले.शीना बोराच्या हत्येपूर्वी व हत्येनंतर इंद्राणी व श्याम राय यांच्यात मोबाइलद्वारे संवाद झाला होता. त्यामुळे इंद्राणीच्या आवाजाच्या नमुन्याची चाचणी घेण्यासाठी गेल्या आठवड्यात सीबीआयने दंडाधिकाऱ्यांपुढे अर्ज केला होता. हा अर्ज मंजूर करताना दंडाधिकारी आर. व्ही. अदोने यांनी कारागृह मॅन्युअलप्रमाणे आवाजाची चाचणी घेण्यात यावी, असा आदेश सीबीआयला दिला.इंद्राणीला दंडाधिकाऱ्यांपुढे हजर करताच, त्यांनी तिला सीबीआयच्या अर्जाविषयी विचारणा केली. त्यावर इंद्राणीने ही चाचणी कशाबद्दल आहे? हे (आवाज) कशाबरोबर जुळवण्यात येणार आहे? अशी विचारणा दंडाधिकाऱ्यांकडे केली. त्यावर दंडाधिकाऱ्यांनी सीबीआयच्या वकिलांना येऊ द्या, असे उत्तर इंद्राणीला दिले. सीबीआयच्या वकील कविता पाटील उपस्थित राहिल्यानंतर इंद्राणीने चाचणीसाठी सहमती देण्यास तयार आहोत, पण हे (आवाज) कशाबरोबर जुळवण्यात येणार आहे? अशी विचारणा अॅड. पाटील यांच्याकडे केली.काही आवाजांबरोबर इंद्राणीचा आवाज जुळवायचा आहे, असे उत्तर अॅड. पाटील यांनी देताच इंद्राणीने आणखी चौकशी केली. मात्र, अॅड. पाटील यांनी याच्याशी इंद्राणीचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले. त्यानंतर इंद्राणीने दंडाधिकाऱ्यांना आवाजाच्या नमुन्याची चाचणी घेण्यासाठी लेखी परवानगी दिली. ४३वर्षीय इंद्राणी मुखर्जी, तिचा दुसरा पती संजीव खन्ना व ड्रायव्हर श्याम राय यांच्यावर शीना बोराची हत्या केल्याचा आरोप आहे.
आवाजाचे नमुने देण्यास इंद्राणी तयार
By admin | Published: November 04, 2015 3:21 AM