- डिप्पी वांकाणी, मुंबईएके काळी आलिशान जीवन जगणाऱ्या आणि नेहमी आंतरराष्ट्रीय स्थळांना भेटी देणाऱ्या इंद्राणी मुखर्जीचे तुरुंगातील दिनचर्येशी जुळवून घेण्यासाठी भायखळा येथील कारागृहात समुपदेशन चालू असून, त्याला ती सहकार्य करीत आहे.अन्य महिला कैद्यांप्रमाणे तीसुद्धा हिरवी साडी परिधान करीत आहे आणि अन्य कैद्यांप्रमाणे कारागृहातील किरकोळ कामे करताना दिसत आहे. समुपदेशन आणि अन्य सर्वच बाबतीत ती सहकार्य करीत आहे. त्याचबरोबर निद्रानाशाच्या आणि चकरा येण्याच्या तिच्या तक्रारी आता कमी झाल्याचे कारागृह सूत्रांनी सांगितले.२ आॅक्टोबर रोजी इंद्राणी मुखर्जी खाली कोसळली होती आणि १५ तास बेशुद्धावस्थेत होती. तिच्या शरीरात अचानक काही भागांना रक्तपुरवठा कमी होत होता. त्यामुळे त्या क्रॉनिक इसामिया या विकारासाठीची आणि व्हिटॅमिन्सची औषधी तिला दिली जात आहेत. एका ज्येष्ठ कारागृह अधिकाऱ्याने सांगितले की, अन्य महिला कैद्यांप्रमाणे इंद्राणीही हिरवी साडी परिधान करीत असून, स्वत:ची कामे स्वत: करताना ती कपडेही धूत आहे. आम्ही तिचे समुपदेशन सुरू केले असून, त्याला ती चांगले सहकार्य करीत आहे.यापूर्वी इंद्राणीला ५ आणि ६ क्रमांकाच्या बराकीत ठेवण्यात आले होते. त्यावेळी तिच्यासोबत अन्य ४० महिला कैदीही होत्या, पण आता तिला दुसरीकडे हलविण्यात आले असून, महिला कैद्यांची संख्याही कमी आहे. तिच्यावर कारागृह कर्मचाऱ्यांची आता सतत निगराणी आहे, असेही हा अधिकारी म्हणाला.यापूर्वी इंद्राणीने निद्रानाश आणि मानसिक तणावाची तक्रार केल्यानंतर तिला त्या विकारावर दिली जाणारी औषधी जे. जे. इस्पितळातील व्हिजिटिंग डॉक्टरांनी दिली होती. कारागृहात डांबल्यानंतर लगेचच तिने निद्रानाश आणि चकरा येत असल्याची तक्रार केली होती. आता मात्र तिची निद्रानाश किंवा चकरा येण्याची तक्रार बंद झाली आहे. आता ती मोठ्या प्रमाणावर धार्मिक पुस्तकांचे वाचन करीत आहे. कारागृहात राहण्याची मानसिक स्थिती तयार करून आपला वेळ घालवीत आहे, असे एका सूत्राने सांगितले.सुकामेवा व फळांची खरेदीइंद्राणीने पीटर मुखर्जीला चार पत्रे लिहिली असून, पीटरने मात्र तिला केवळ दोन पत्रांचे उत्तर दिले आहे. या पत्रातील मजकूर खासगी स्वरूपाचा असून, या पत्रात कारागृहातील सुरक्षेबाबत किंवा आक्षेपार्ह माहिती आहे किंवा काय, याची तपासणी कारागृह कर्मचाऱ्यांनी केली, असे एका सूत्राने सांगितले. या कारागृहातील कैदी महिन्याला दोन हजार रुपये खर्च करून कॅन्टीनमधील उपलब्ध वस्तू खरेदी करू शकतो. इंद्राणी या रकमेचा वापर मिनरल वॉटर, फळे आणि सुकामेवा खरेदीसाठी करीत असल्याची माहिती या सूत्रांनी दिली.
इंद्राणी तुरुंगाशी घेतेय जुळवून !
By admin | Published: October 25, 2015 1:48 AM