वारकऱ्यांची इंद्रायणी स्वच्छ होणार; खुद्द शरद पवारांनी घेतली जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 02:06 PM2020-02-08T14:06:07+5:302020-02-08T14:07:19+5:30
उपमुख्यमंत्री पुण्याचे पालकमंत्री असून त्यांच्याकडे इंद्रायणी शुद्ध करण्याची अधिक जबाबदारी आहे. पवार घराण्यात जन्म घेणाऱ्याचे इंद्रायणी स्वच्छ करणे कर्तव्य असल्याचे अजित पवारांचे नाव न घेत शरद पवार म्हणाले.
मुंबई - आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी जबाबदारी घेतली. तसेच इंद्रायणी स्वच्छतेचे पवार घराण्याचे कर्तव्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात इंद्रायणी नदी स्वच्छ होणार असं दिसत आहे. कीर्तन परंपरेला आकार देण्यासाठी आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना करणाऱ्या विष्णुपंत जोग महाराजांच्या शतकोत्तर पुण्यस्मरण सोहळ्यात ते बोलत होते.
इंद्रायणी शुद्धी करण्याची मागणी होत असून मला लक्ष घालण्यास विनंती करण्यात येत आहे. मी मंत्री वगैरे नाही. तरी समाजासाठीची मागणी असल्यामुळे ही पूर्ण होईल, असं पवार म्हणाले. तुम्ही स्वत:साठी काहीही मागत नाही. समाजासाठीची मागणी पूर्ण होणार नसेल तर सरकार काय कामाचे असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान इंद्रायणी शुद्धीसाठी पाठबंधारे विभागाकडे जावं लागणार आहे. त्यासाठी पाठबंधारे मंत्री जयंत पाटील यांना सांगू. त्याचवेळी पुण्याचे पालकमंत्री यांची जबाबदारी अधिक आहे. ही समस्या त्यांच्या कानावर टाकू, ते काय म्हणतात पाहू. तुमच्या सांगण्यावरून मी उपमुख्यमंत्र्यांशी बोलेल अशी कोपरखळी पवारांनी लागवली. तसेच पुढील 8 ते 10 दिवसांत तुम्ही मुंबईला माझ्याकडे या, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, पालकमंत्री, पाठबंधारे मंत्री सर्वांना एकत्र करून हा प्रश्न सोडवू, असा शब्द शरद पवारांनी उपस्थितांना दिला.
हे तर, पवार घराण्याचे कर्तव्य
उपमुख्यमंत्री पुण्याचे पालकमंत्री असून त्यांच्याकडे इंद्रायणी शुद्ध करण्याची अधिक जबाबदारी आहे. पवार घराण्यात जन्म घेणाऱ्याचे इंद्रायणी स्वच्छ करणे कर्तव्य असल्याचे अजित पवारांचे नाव न घेत शरद पवार म्हणाले. त्यातच अजित पवारांच्या कामाचा झपाटा पाहता, येणाऱ्या काही दिवसांत इंद्रायणी स्वच्छ होणार अशी भावना उपस्थित वारकऱ्यांनी व्यक्त केली.