पिंपरी (पुणे) : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची जन्मभूमी असणाऱ्या मावळ तालुक्यातील इंद्रायणी तीरावरील देहूनगरीत शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवार, दि. १४ जूनला होणार आहे. सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, पंतप्रधानांच्या स्वागतासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आवार, शिळामंदिर, सभास्थानाची पाहणी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. दुपारी एक ते दोन या कालखंडात पंतप्रधान देहूनगरीत येणार असून, मंदिरातील सोहळा आणि वारीच्या अनुषंगाने वारकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावरील माळवाडी हद्दीत २२ एकर जागेत बंदिस्त सभागृह तयार केले आहे. त्या ठिकाणी ५० हजार वारकरी बसतील, एवढी क्षमता आहे.
पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी गुरुवारी येथील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने, पंतप्रधान आल्यानंतर मंदिर आवारात कोण उपस्थित राहणार, सोहळ्याच्या ठिकाणी आसन व्यवस्था, पार्किंग व्यवस्था कशी असेल, याचा आढावा घेण्यात आला.