अकोले - गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सुरु असलेल्या कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचा वाद आणखी तीव्र होत चालला आहे. इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ सोमनाथ भोर महाराजांनी तृप्ती देसाई यांना फोन करुन धमकी दिली होती. त्यात तु फक्त अकोलेला ये, तुला कापून टाकतो असे तीव्र शब्द वापरण्यात आले होते. त्याबद्दल अखेर भोर महाराजांनी माफी मागितली आहे.
याबाबत तृप्ती देसाई यांनी भोर महाराजांविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. इंदोरीकर महाराजांची बदनामी केल्यामुळे सोमनाथ भोर महाराजांनी तृप्ती देसाई यांना फोन करुन शिवीगाळ केली होती तसेच कापून टाकण्याची धमकी दिली होती. मात्र आता त्यांनी माफी मागत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. देसाईंना जे काही बोललो त्याचा इंदोरीकरांशी संबध नाही, राग अनावर झाल्याने मी बोललो त्याबद्दल माफी मागतो असं सोमनाथ भोर महाराजांनी म्हटलं आहे.
कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर हे गर्भलिंग निदान वक्तव्यावरुन अडचणीत आले होते. या प्रकरणावरुन राजकीय वातावरणही पेटलं होतं. इंदोरीकर महाराजांच्या विधानावर आक्षेप घेत काहींनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर इंदोरीकरांच्या समर्थनार्थ अनेक संघटना पुढे सरसावल्या होत्या.
इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करावा या आग्रही मागणीसाठी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी अहमदनगरमध्ये जाऊन पोलीस अधिक्षकांना निवेदन दिलं होतं. इंदोरीकर महाराज नेहमी कीर्तनातून महिलांचा अपमान करतात असा आरोप त्यांनी केला होता. त्याचसोबत ४ दिवसांत गुन्हा दाखल न झाल्यास इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू असा इशारा दिला होता. मात्र तृप्ती देसाई यांच्या इशाऱ्यावरुन मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी त्यांना प्रतिइशारा दिला होता.
इंदोरीकर महाराजांच्या विरोधात बोलल्यामुळे तृप्ती देसाई यांच्याविरोधात अनेकजण आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं, सोशल मीडियावर असेल वा तृप्ती देसाई यांना फोन करुन आक्रमक आणि शिवीगाळ भाषा वापरण्यात येते असा आरोप तृप्ती देसाईंनी केला आहे. तसेच २५ तारखेला मी माझी भूमिका मांडेन, कायदेशीर कारवाई करण्याबाबत बोलेन असं तृप्ती देसाईंनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
Video: ताई, आता बस्स कर! फक्त महाराज इंदोरीकर; सोशल मीडियावर 'या' गाण्याचा धुमाकूळ
इंदोरीकर महाराजांचा 'हा' व्हिडिओ बघाच; मनसेचा तृप्ती देसाईंना टोला
कीर्तनातील 'त्या' वादग्रस्त विधानावरुन इंदोरीकर महाराजांनी केला मोठा खुलासा; कारवाई टळली
इंदोरीकर महाराजांची शैली कीर्तन परंपरेला बाधा आणणारी ; सदानंद मोरे
अखेर इंदोरीकर महाराजांनी दिलं नोटिशीला वकिलामार्फत उत्तर, म्हणतात की...