जळगाव-
शासकीय कर्मचाऱ्यांच्या बुद्धीचं मोजमाप करुनच त्यानुसार त्यांचे पगार ठरवले गेले पाहिजेत, असं विधान प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं आहे. जळगाव शहरातील पिंपळा येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कीर्तनाच्या कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं आहे.
"जे काम करत नाहीत त्यांना पगार जास्त आणि जे काम करतात त्यांना पगार कमी अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सरकारी विभागानं जानेवारी महिन्याच्या पहिल्या तारखेला कर्मचाऱ्यांची बुद्धी मोजली पाहिजे व त्यानुसार त्यांचा पगार ठरवला पाहिजे", असं इंदुरीकर महाराज म्हणाले.
स्मार्टफोनच्या दुष्परिणामांवरही भाष्य"मोबाईलच्या अतिरेकामुळे शाळकरी विद्यार्थी शिक्षणापासून दुरावत चालले आहेत. त्याचे दुष्परिणामही आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या महाविद्यालयीन तरुणांसोबतच विद्यार्थीही मोबाइल व्यसनाच्या आहारी केले आहेत. या सर्व गोष्टींचा परिणाम मुलांच्या संस्कारावर पडला आहे", असं इंदुरीकर महाराज म्हणाले.
तरुण पिढी दारुच्या आहारीसध्याची तरुण पिढी दारूच्या आहारी जात असल्याचा उल्लेख करत इंदुरीकर यांनी तरुणांच्या दारुच्या आहारी जाण्यामुळे दारुचा खप वाढल्याचं म्हटलं. "तरुण पिढी दारूच्या इतकी आहारी गेली आहे की त्यामुळे दारूचा खप वाढला आहे. भविष्यात या तरुणांना लग्नासाठी मुली मिळणार नाहीत", असा मिश्किल टोला लगावत इंदुरीकर यांनी उपस्थिती तरुणाईचे कान टोचले.