पुणे : डॉ़ कस्तुरीरंगन समितीने, पश्चिम घाट हा पर्यावरण क्षेत्र तयार करण्यासाठी केलेल्या शिफारसींमुळे औद्योगिक वसाहतीवर परिणाम होऊन विकासाला खीळ बसणार असेल तर या वसाहती वगळण्याची विनंती केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाकडे करणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले़ अॅड़ जयदेवराव गायकवाड यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना त्यांनी ही ग्वाही दिली़ महाराष्ट्रातील उद्योग समूहासमोर निर्माण झालेल्या या संकटांची माहिती या लक्षवेधीतून दिल्याचे अॅड़ गायकवाड यांनी सांगितले़ अॅड़ गायकवाड म्हणाले, की डॉ़ माधव गाडगीळ आणि डॉ़ कस्तुरीरंगन समितीने देशभरातील ५६ हजार ८२५ वर्ग किलोमीटर एवढा भाग हा पर्यावरण संवेदनशील म्हणून घोषित केला आहे़ त्यात रोहा, नागोठणे अशा एकूण राजगड व कोल्हापूर भागातील एकूण १५ औद्योगिक वसाहतींचा समावेश हा पर्यावरण संवेदनशील भागात झाला आहे़ त्यामुळे हे उद्योग दुसऱ्या राज्यात जाण्याच्या मार्गावर आहेत़ त्यामुळे ५ हजार कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्नही उपस्थित झाला आहे़ केंद्र सरकारच्या २८ फेबु्रवारी २०१७ च्या गॅझेटनुसार ६० दिवसांच्या आत हरकती नोंदविणे गरजेचे आहे़ मात्र हरकती न नोंदविल्यास हे उद्योग बंद पडणार आहेत़ त्यामुळे सरकारने लक्ष देणे गरजेचे असल्याचे अॅड़ गायकवाड यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)महाराष्ट्रातील उद्योग समूहासमोर निर्माण झालेल्या या संकटांची माहिती लक्षवेधीद्वारे विधान परिषदेत मांडण्यात आली होती.केंद्र सरकारचे औद्योगिक क्षेत्रातील समस्येकडे लक्ष वेधण्यचा प्रयत्न केल्याचे अॅड. गायकवाड म्हणाले.
औद्योगिक वसाहती वगळण्याची विनंती
By admin | Published: April 03, 2017 1:16 AM