औरंगाबाद : इंडस्ट्रीयल एनएची सनद ३० दिवसांत जर संबंधित उद्योग सुरू करणाऱ्यास मिळाली नाही, सनद रोखून उद्योजकास टेबलावर ‘वजन’ ठेवण्याच्या मागणीची साधी तक्रारदेखील शासनाला प्राप्त झाली तर संबंधित अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे दिला. मराठवाडा असोसिएशन आॅफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रिकल्चर (मसिआ) आणि सहसंयोजक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यातर्फे आयोजित ‘अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो-२०१७’चे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महापौर भगवान घडामोडे, खा. चंद्रकांत खैरे व अन्य मान्यवर उपस्थित होते.औद्योगिक एनएची सनद ३० दिवसांत देणे जिल्हाधिकाऱ्यांना बंधनकारक आहे. महसूल पातळीवर सनदेची फाइल रेंगाळत असेल तर संबंधित अधिकाऱ्यास तातडीने निलंबित करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, सीईआेंना उद्देशून दिले. उद्योगांचे इन्स्पेक्शन करताना चहापाण्यासाठी उद्योगांना देण्यात येणारा त्रास कमी व्हावा, यासाठी सोडतीनुसार ५, ३ आणि १ वर्षांनी इन्स्पेक्शनचे टप्पे करण्यात आले आहेत. इन्स्पेक्शनचा अहवाल इन्स्पेक्टरने ४८ तासांत आॅनलाइन टाकण्याचे आदेशही उद्योग विभागाला दिले असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
इंडस्ट्रीयल ‘एनए’ची सनद रोखाल तर घरी...
By admin | Published: January 06, 2017 3:49 AM