लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी पुकारण्यात आलेल्या बंदला पिंपरी-चिंचवडमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. पिंपरीतील बाजारपेठांसह शहरातील इतर भागातील बाजारपेठेतील व्यवहारही सुरळीत सुरू होते. तर शहराच्या काही भागात व्यापाऱ्यांनी बंद पाळण्यासह शिवसेनेने पिंपरीत रास्ता रोको करीत बंदला पाठिंबा दिला. पिंपरीतील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईत सकाळपासूनच व्यवहार सुरळीत सुरू होते. दरम्यान, भाज्यांची आवक काहीप्रमाणात घटल्याने पालेभाज्या आणि फळभाज्यांचे भाव चढेच राहिले. कोथिंबीरच्या जुडीला ३५ ते ४० रुपयांचा भाव मिळाला. यासह मिरचीचे भाव देखील चढेच राहिले. सोमवारी मिरचीची ८० रुपये किलो दराने विक्री झाली. मेथी, शेपू २० रुपयांना तर मुळा जुडीची ३० रुपयांना विक्री झाली. यासह कपड्यांच्या बाजापेठेतीलही दुकाने खुली होती. तसेच व्यवहारही सुरळीतपणे सुरू होते. कपडे खरेदीसाठी नेहमीप्रमाणे नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. बोपखेलमध्येही या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. सर्व दुकाने व व्यवहार सकाळपासूनच सुरू होते. महाराष्ट्र बंदचा सर्वसामान्याच्या दैनंदिन जीवनावर काही परिणाम झाला नाही. बंद पाठिंबा देण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी मुंबई-पुणे महामार्गावरील पिंपरी चौकात रास्ता रोको आंदोलन केले. शिवसेनेचे शहरप्रमुख व महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे, शहरसंघटिका सुलभा उबाळे, शारदा बाबर, सुशीला पवार, नगरसेवक अमित गावडे, माजी नगरसेवक मारुती भापकर, अनंत कोरहाळे, विनायक रणसुभे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे महामार्गावर काही काळ वाहतूककोंडी झाली होती. >विविध संघटनांचा पाठिंबासंभाजी ब्रिगेड, शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह विविध सामाजिक संघटनांतर्फे पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागात रॅली काढून संपाला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यासह डांगे चौैक परिसरात बंदला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.सोमवारी सकाळपासूनच बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी दिसून येत होती. फळभाज्या व पालेभाज्यांच्या दरांमध्ये काहीसा चढउतार दिसून आला. बंददरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. >थेरगावात दूध फेकले रस्त्यावरथेरगाव : गुजरनगर येथील मीरा क्लासिकमधील सिद्धार्थ दूध डेअरी येथे गोवर्धन दुधाचा टेम्पो १५ ते २० जणांच्या टोळक्याने रविवारी रात्री अडवून दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकून दिल्या आणि गाडीची हवा सोडून दिली. या वेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांची घोषणाबाजी केली. शेतकरी संपाची दाहकता पसरत असून, दूध व भाजीपाला विक्रीस तुटवडा निर्माण झाला आहे. दूध फेकून दिल्याने जवळपास १०० लिटर दुधाची नासाडी झाली.
उद्योगनगरीत बंदला संमिश्र प्रतिसाद
By admin | Published: June 06, 2017 1:48 AM