ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 17 - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जागेवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, या जागेवरील अधिकृत झोपडपट्ट्यांसाठी ‘झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प’ (एसआरए) राबविण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
विविध प्रश्नांबाबत उद्योगमंत्र्यांसमवेत एमआयडीसी आणि महापालिका अधिकाºयांची बैठक सोमवारी चिंचवड येथील आॅटो क्लस्टर येथे झाली. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार गौतम चाबुकस्वार, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश सुरवडे, प्रादेशिक अधिकारी अजित देशमुख, अधीक्षक अभियंता एस. ए. दराडे आदी उपस्थित होते.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना देसाई म्हणाले, पिंपरी-चिंचवडच नव्हे, तर नवी मुंबई आदी एमआयडीसीच्या क्षेत्रावरदेखील अधिकृत झोपडपट्ट्या आहेत. त्यांच्यासाठीही पुनर्विकास योजना राबविण्याचे विचाराधीन आहे. यासाठी एमआयडीसीने सल्लागार नेमून योजना तयार केली असून, ही योजना शासनाच्या परवानगीने राबविण्यात येणार आहे.
एमआयडीसीने काही भूखंड महापालिकेकडे वृक्षारोपणासाठी हस्तांतरित केले आहेत. यातील काही ठिकाणी महापालिकेने वृक्षारोपण, बगीचे तयार केले. मात्र, काही ठिकाणच्या भूखंडांवर अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण महापालिकेने काढून त्या ठिकाणी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे अन्यथा ते मोकळे भूखंड महापालिकेने एमआयडीसीला परत करावेत. तसेच काही ठिकाणी खडीचे क्रशर सुरू असून, अशाप्रकारे मोकळ्या मैदानावर क्रशरची उभारणी करता येत नाही. त्यामुळे ते तत्काळ बंद करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.