मुंबई : भारतात येणाऱ्या थेट परदेशी गुंतवणुकीपैकी ३५ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात केली जाते. परदेशी गुंतवणुकीसाठी आणि उद्योग उभारणीसाठी महाराष्ट्राला सर्वात जास्त पसंती दिली जात असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुंबईत झालेल्या चौथ्या चीन-भारत फोरममध्ये बोलताना केले. यावेळेस खा. तरुण विजय, कर्नाटकचे उद्योगमंत्री आर.व्ही. देशपांडे, चायना-इंडिया फ्रेंडशिप असोसिएशनचे अध्यक्ष जिआंग झेंगुहा, चीनचे भारतातील राजदूत ही ली यूचेंग आणि इंटरनॅशनल बिझनेस लिंकेज फोरमचे (आयबीएलएफ) अध्यक्ष राजीव पोदार उपस्थित होते.देसाई पुढे म्हणाले, ऊर्जा, बांधकाम तसेच ई- कॉमर्स क्षेत्रांमध्ये एकत्र काम करण्याची संधी दोन्ही देशांना आहे. भारताच्या स्मार्ट सिटीसारख्या महत्वाकांक्षी योजनांमध्येही चीन गुंतवणूक करु शकतो. देशाच्या एकूण निर्यातीपैकी ३० टक्के निर्यातही येथून होते.रोज चार हजार स्टार्ट-अप्सची नोंदणी : चीनच्या अर्थव्यवस्थेसमोर सध्या तात्पुरता अडथळा आला असला तरी ती सक्षम आणि शाश्वत असल्याचे मत चीनचे भारतातील राजदूत ही ली यूचेंग यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, सध्या चीनमध्ये दररोज चार हजार नव्या स्टार्ट अप्सची नोंदणी होत आहे आणि वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये चीनचे नाव अजूनही आहे. भारतात गेल्या वर्षभरात उद्योगाचे चित्र बदलल्याचे दिसत आहे.
‘उद्योग, गुंतवणुकीत महाराष्ट्रच नंबर वन’
By admin | Published: November 20, 2015 1:53 AM