लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कृषीकर्ज माफ करणे हे शेतीविषयक समस्यांवरील उत्तर नसून, शेती फायद्याची व्हावी यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी उद्योगजगताने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे, असे आवाहन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सोमवारी केले.महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर आयोजित व्याख्यानात डॉ. मोहन भागवत बोलत होते. ते म्हणाले, समाज सक्षम करण्यासाठी उद्योग-व्यापार आणि कृषी या क्षेत्रांना एकत्रितपणे काम करावे लागेल; कारण ही क्षेत्र परस्पर पूरक आहेत.भारतीय उद्योग-व्यापार जगत हे जगभरात त्याच्या अव्वल विश्वासार्हतेबद्दल प्रसिद्ध आहे. कारण भारतीय माणूस कधीही केवळ पैशाचा विचार करीत नाही, तो समग्र समाजाच्या कल्याणाचा विचार करतो. हीच भारतीय संस्कृती आहे, असे सांगून ते म्हणाले, समाजवादी व्यवस्थेत उद्योगाचे नुकसान करून श्रमिकांच्या फायद्याचा विचार होतो, तर भांडवलदार पाश्चात्य व्यवस्थेत श्रमिकांचे नुकसान करून उद्योगांच्या फायद्याचा विचार केला जातो. भारतीय संस्कृतीत मात्र, या दोन्ही घटकांबरोबरच सर्व समाजाच्या कल्याणाचा विचार आहे. यावेळी मंचावर महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चरचे आजी-माजी पदाधिकारी आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे उपस्थित होते.
फायद्याच्या शेतीसाठी उद्योगजगताने पुढाकार घ्यावा
By admin | Published: June 27, 2017 2:05 AM