ठाणे : ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सलग दुसऱ्या दिवशीही शास्त्रीनगर ते हत्तीपूल परिसरातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा टाकला. दुसऱ्या दिवशी सुमारे १७५ बांधकामे जमीनदोस्त करताना पालिकेने येथील रिपाइंचे वजनदार नेते मानल्या जाणाऱ्या इंदिसे कुटुंबाच्या घरावर आणि त्यांच्या कार्यालयावरदेखील हातोडा टाकला. इंदिसे यांनी याच घरातून आणि कार्यालयातून आपले राजकीय साम्राज्य उभे केले होते. परंतु, त्यांच्या या साम्राज्याला अखेर पालिकेने पोलीस बंदोबस्तात हादरा दिला. विशेष म्हणजे ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच पालिकेने या कारवाईच्या निमित्ताने इंदिसे कुटुंबाला मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे. पोखरण १, २, स्टेशन परिसर, कोपरी, कळवा आणि मुंब्रा येथील अतिक्रमणांवर कारवाई केल्यानंतर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारपासून शास्त्रीनगर ते हत्तीपूल मार्गातील अतिक्रमणांवर कारवाईस सुरुवात केली आहे. बुधवारी दिवसभरात सुमारे ३०० हून अधिक बांधकामांवर कारवाई केली होती. त्यानंतर, गुरुवारीदेखील ती सुरूच होती. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर १५० हून अधिक पोलीस परिसरात तैनात केले होते. महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेल्या चार पथकांमार्फत बांधकामे पाडण्यात येत होती. जेसीबी तसेच पोकलेनच्या माध्यमातून ती जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईत शास्त्रीनगर ते हत्तीपूल या मार्गावरील बांधकामे पाडण्यात आली. तसेच लक्ष्मीनगर भागातील बेकायदा बांधकामेही तोडण्यात आली. घरांवर बुलडोझर फिरवण्यापूर्वी रहिवाशांचे पुनर्वसन केल्यामुळे कोणताही विरोध झाला नाही. कारवाईच्यावेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याच शास्त्रीनगर भागात ठाण्यातील रिपब्लिकन पक्षातील वजनदार नेते इंदिसे कुटुंबीयांचे घर आणि कार्यालय आहे. याच घरातून आणि कार्यालयातून त्यांनी शास्त्रीनगरमध्ये राजकीय साम्राज्य उभे केले होते. त्यामुळे इंदिसे कुटुंबातील अनेक जण महापालिकेतील लोकप्रतिनिधी होऊन गेले. गेल्या दोन दिवसांपासून शास्त्रीनगरात सुरू असलेल्या कारवाईमुळे त्यांच्या साम्राज्याला एक प्रकारे सुरुंग लागला असतानाच गुरुवारच्या कारवाईत अतिक्र मण पथकाने त्यांचे घर आणि कार्यालयही भुईसपाट केले.
इंदिसेंचे साम्राज्य जमीनदोस्त
By admin | Published: May 21, 2016 4:08 AM