ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - बिल्डर प्रदीप जैन हत्याप्रकरणात टाडा कोर्टाने कुख्यात डॉन अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यातील अन्य दोघा दोषींनाही कोर्टाने आर्थिक दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
७ मार्च १९९५ रोजी बिल्डर प्रदीप जैन यांची जुहूतील बंगल्याबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. धमक्यांना प्रतिसाद न मिळाल्याने अबू सालेमने ही हत्या घडवल्याचे पोलिस तपासात उघड झाले होते. याप्रकरणी अबू सालेमसह त्याचा चालक मेहंदी हसन आणि बिल्डर व्ही. के. जांब या तिघांविरोधात मुंबईतील टाडा न्यायालयात खटला सुरु होता. गेल्या आठवड्यात कोर्टाने या तिघांनाही दोषी ठरवले होते. अहंकार दुखावल्यानेच सालेमने जैन यांची हत्या केली असेही कोर्टाने नमूद केले होते.
कोर्टाने दोषी ठरवल्याने शिक्षेविषयी युक्तीवाद झाला. बुधवारी या खटल्याचा निकाल देताना कोर्टाने सालेमला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. पोर्तूगालमधून भारतात शरण आल्यावर सालेमविरोधात विविध प्रकरणांमध्ये अटक झाली असून ही सर्व प्रकरणं सध्या न्यायालयीन प्रक्रियेत आहे. सालेमला जन्मठेपेची शिक्षा झाल्याचा हा पहिलाच खटला आहे. सालेमचा चालक मेहंदी हसनलाही कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.