अमरावती : दिवाळीच्या आधीच या जगात पाऊल ठेवणाऱ्या एका लहान बाळाचा मृतदेह एका छोट्याशा बॉक्समध्ये अमरावतीत सापडला. यावरून गहिवरलेल्या समाजसेविका गुंजन गोळे यांनी प्रेमप्रकरणं करणाऱ्या तरुण तरुणींना जाब विचारला आहे. अंतिम विधी कोणाचा करतोय ते पाहा. नालायकानो, तुम्ही लफडे करा, पण असा या लेकरांचा जीव घेण्याचा कुठलाच अधिकार नाही. लाज वाटत नाही का, असा प्रश्न त्यांनी अमरावतीच्या मुला-मुलींना विचारला आहे.
अमरावतीमध्ये पलाश लाईनमध्ये एका बॉक्समध्ये पिशवित लपेटलेल्या अर्भकाचा मृतदेह दोन दिवसांपूर्वी सापडला. या अर्भकावरील सर्व कायदेशीर सोपस्कार करण्यात दोन दिवस गेले. सोमवारी या अर्भकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या या अर्भकाला लाजेखातर एका निर्जन ठिकाणी टाकण्यात आले होते. या अर्भकावर अंत्यसंस्कारावेळी गुंजन गोळे यांनी बेदरकार झालेल्या तरुण-तरुणींना फेसबुक लाईव्हद्वारे जाब विचारला आहे.
लाजा वाटू द्या मुलांनो, ते पोलिसही रडत आहेत. लोकांना 20-20 वर्षे मुलं होत नाहीत. आई-वडील शिकायला पाठवतात. सगळे धंदे करा, पण असे कृत्य करू नका. मुलींच्या पोटात बाळ असते, तेव्हा ती आई झालेली असते. मुलांना जन्म द्या. लाज वाटत असेल तर अमरावतीला या, प्रसुती करते. बाळ आम्हाला द्या, सांभाळायला तयार आहे असे आवाहनही त्यांनी या व्हिडिओमध्ये केले आहे. या व्हिडिओमध्ये बाळावर अंत्यसंस्कार करतानाचीही दृष्ये आहेत.
महाराष्ट्रात एवढा शेअर करा हा व्हिडिओ की तो त्या मुला, मुलीपर्यंत पोहोचायला हवा. तुमच्या 10 मिनिटांच्या मौज-मस्तीसाठी एवढ्या थराला जाऊ नका. पलाशच्या सीसीटीव्हीमध्ये हा गैरकृत्य करणारा कैद झाला आहे. त्याच्या फोटो मिळाल्यास त्याला शिक्षा होणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे.