- जितेंद्र कालेकर, ठाणेकरोडो रुपयांच्या इफेड्रीन तस्करीप्रकरणी चौकशीसाठी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची दोन पथके गुजरात आणि सोलापूरला रवाना झाली आहेत. अमेरिकन पोलिसांनी अटक केलेला मुख्य सूत्रधार विकी गोस्वामीसह सर्वच आरोपींविरुद्धचे भक्कम पुरावे गोळा करण्यासाठी बुधवारी अटक केलेल्या किशोर राठोड आणि भरत काठिया यांची सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.सोलापुरातून देशविदेशांत इफेड्रीनची तस्करी करणाऱ्या सूत्रधारांपैकी एक जयमुखीला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात यापूर्वीच इफेड्रीन प्रकरणातील तिसरे ३४० पानांचे आरोपपत्र ठाणे विशेष जिल्हा सत्र न्यायालयात दाखल झाले आहे. त्याने दिलेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी तसेच पुरावे गोळा करण्यासाठी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ठाणे न्यायालयात किशोर राठोड आणि भारत काठिया यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. त्यांच्याकडील चौकशीमध्ये किशोरने अनेक बाबींची कबुलीच पोलिसांना दिली. जयमुखीने नोंदवलेल्या जबानीतील अनेक बाबींमध्ये तथ्यता आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली.इफे ड्रीनच्या तस्करीसाठी एव्हॉनचा तत्कालीन संचालक मनोज जैन, पुनीत श्रींगी आदींबरोबर केनिया, दुबई आणि मुंबईतील बैठकांना जयमुखी हजर होता. शेअरखरेदीचे ज्ञान अवगत असल्यामुळे एव्हॉनचे शेअर्स ममताच्या नावावर करण्याची प्रक्रियाही त्याने सुरू केली होती. किशोर आणि मनोज जैन यांच्यात मध्यस्थाची भूमिका त्याने केली. गुजरातमध्ये पकडलेल्या १३०० किलो इफे ड्रीन प्रकरणातही त्याचा महत्त्वाचा सहभाग होता. ड्रग्जचा काळा पैसा विकीने कशा प्रकारे स्वीकारला, याची माहिती जयमुखीने दिली होती. तीच माहिती आता किशोरनेही दिल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. व्हॉट्सअॅप संभाषणालाही दुजोराममता कुलकर्णी, किशोर राठोड, विकी गोस्वामी यांच्यात झालेल्या व्हॉट्सअॅप संभाषणालाही किशोरने दुजोरा दिला.सोलापुरातून इफेड्रीनचा नेमका किती माल कंपनीतून बाहेर काढला? विकी, जयमुखी आणि किशोर यांच्यात कुठे आणि कशा प्रकारे तस्करीची बोलणी झाली. विकीने मालावर प्रक्रिया कोणत्या ठिकाणी कशा प्रकारे केली, याची माहिती किशोरकडून गुजरात येथून सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझडे, उपनिरीक्षक विजय उपाळे यांचे पथक घेत आहे. किशोरचा साथीदार भारत याच्याकडूनही अशाच प्रकारे सोलापूर येथील एव्हॉन लाइफ सायन्सेस या कंपनीतून इतर तपशिलाची माहिती गोळा करण्यात येत असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांनी दिली.
‘इफेड्रीन’प्रकरणी होणार सखोल चौकशी
By admin | Published: February 03, 2017 2:10 AM