मुंबई : नाशिकमध्ये झालेल्या ५५ नवजात बालमृत्यूंचे खरे कारण धक्कादायक आहे. कागदोपत्री नोंदी ठेवल्या गेल्या, पण गरोदर मातांना पुरसे अन्नच मिळाले नाही, परिणामी त्यांचे बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) १९ पेक्षा कमी असल्याचे निष्कर्ष नाशिकच्या आयुक्तांनी मुख्य सचिव व महिला बाल कल्याण तसेच आरोग्य विभागाच्या सचिवांना दिलेल्या अहवालात नमूद केले आहेत. अहवाल मंत्रालयात आल्यानंतरही सगळ्यांनीच मौन बाळगले आहे.मरण पावलेल्या काही अर्भकांच्या मातांचा बीएमआय १९ पेक्षा कमी होता. एका मातेचे वजन केवळ ३५ ते ३६ किलो होते. म्हणजे माताच कुपोषित होत्या. त्यामुळे बाळाची वाढ कमी होऊन त्यांचेही वजन कमी राहिले किंवा मुदतपूर्व प्रसुती झाल्या. महिला व बाल कल्याण विभागाचा रोख पुरवठा व रेकॉर्ड नीट ठेवण्याकडे होता. त्याचे पुढे काय झाले याकडे दुर्लक्ष झाल्याचा निष्कर्षही काढण्यात आला आहे. ज्या गरोदर मातांचा बीएमआय १९ पेक्षा कमी होता, तो वाढण्यासाठी विशेष तयारी केली का? याचे उत्तर नकारात्मक आल्याचेही हा अहवाल सांगतो. गरोदर मातेच्या बीएमआयसाठी आणि अर्भकाच्या वाढीसाठी राज्यस्तर, जिल्हास्तर आणि तालुका स्तरावर तसेच अंगणवाडी स्तरावर आढावा आवश्यक आहे.कठोर कारवाईची आवश्यकतासरकारच्या योजना चांगल्या आहेत, पण त्याचे नियोजन अत्यंत ढिसाळपणे झाले आहे. योजना प्रभावीपणे राबवायची असेल तर वरिष्ठ पातळीवरील अधिकाºयांपासून ते अंगणवाडी सेविका, आशा वर्करपर्यंत कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांत कोणावरही ना आक्षेप घेतले गेले ना कारवाई केली गेली.कमी वयाची मुले जन्माला आल्यास त्यांना इनक्युबिटरमध्ये ठेवले जाते, मात्र नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात इनक्युबिटरमध्ये दोन वा तीन मुले ठेवल्याचे समोर आल्याचेही ज्येष्ठ अधिकाºयाने सांगितले.आयुक्त महेश झगडे यांनी समिती नेमली होती. त्या समितीने हे सारे नमूद केले आहे. महिला व बालकल्याण आणि आरोग्य विभागाने गरोदर मातांना सोयीसुविधा पुरविल्याचे दाखवले आहे. पण त्या दिल्या नसल्याचा संशय अहवालात आहे.
बालमृत्यूंचे मूळ मातांच्या कुपोषणात!, बाळांची वाढही अपुरीच
By अतुल कुलकर्णी | Published: October 05, 2017 5:44 AM