अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेला अर्थसंकल्प महागाईला चालना देणारा आणि आर्थिक विकासाला खीळ घालणारा आहे, अशी टीका खासदार विजय दर्डा यांनी केली आहे. ते म्हणाले की, पायाभूत सुविधांमध्ये येऊ पाहणाऱ्या खासगी कंपन्यांना तसेच जादा रोजगारनिर्मिती करू पाहणाऱ्या प्रकल्पांना या अर्थसंकल्पात विशेष प्रोत्साहन दिलेले नाही. नोकरदार वर्गाला दिलासा मिळू शकेल, अशी प्रत्यक्ष करात कोणतीच सवलत न देता अप्रत्यक्ष करात वाढच करण्यात आली आहे. अर्थात अर्थसंकल्पात काही सकारात्मक बाबीही आहेत, याचा उल्लेख करून खा. दर्डा म्हणाले की, मनरेगासाठीची तरतूद वाढवली ही महत्त्वाची बाब. शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा देण्याची तरतूदही चांगली आहे. मात्र त्याची अमलबजावणी कशी होते, हे पाहणे आवश्यक आहे. स्वत:चे दडवलेले उत्पन्न स्वेच्छेने जाहीर करण्यासाठीची तरतूद चांगली आहे. करपद्धतीतील कज्जेबाजी टाळण्यासाठीचा प्रयत्नही स्वागतार्ह आहे. कर भरण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे खेटे घालणे टळणार असल्याने करधारकांना दिलासा मिळू शकेल, असेही खा. दर्डा यांनी सांगितले.
महागाईला चालना देणारा अर्थसंकल्प - खा. विजय दर्डा
By admin | Published: February 29, 2016 9:53 PM