मुंबई : डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्यांची होरपळ सुरू झाली आहे. शहरी मालवाहतूक १००० रुपये व आंतरराज्य मालवाहतूक २००० ते २३०० रुपये महाग झाली आहे. भाडेवाढीमुळे भाजीपाला, धान्याचे दर कडाडले आहेत. शाळांच्या बसभाड्यात १२ ते १५ टक्के वाढ होणार आहे. पेट्रोल १00 रुपयांवर जाईल, असा अंदाज असून, डॉलरच्या तुलनेत रुपयाही गडगडत ७२ रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. हे ‘बुरे दिन’नाच निमंत्रण आहे.स्कूल बस असोसिएशननुसार, भाड्यात आॅक्टोबरपासून वाढ होईल. डिझेलचे दर आणखी भडकल्यास सप्टेंबरमध्ये किमान ५ ते ७ टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. महाराष्टÑात १७ हजार स्कूल बसेस असून, त्यापैकी ८ हजार बसेस मुंबई, नवी मुंबई, पनवेल, कल्याण, ठाणे व वसई-विरार परिसरात धावतात. या बसमालकांनी तत्काळ भाडेवाढीचा प्रस्ताव असोसिएशनकडे दिला आहे.शहरी माल वाहतूक करणाऱ्या छोट्या टेम्पोमालकांनीही भाडेदरात सरासरी १ हजार रुपयांची वाढ केली आहे. मुंबई टेम्पोवाला असोसिएशनचे सचिव सॅमसन जोसेफ म्हणाले की, टेम्पो फेरीच्या ५० ते ७० किमीमागे १००० ते १३०० रुपयांचा खर्च वाढला आहे. असोसिएशन स्तरावर भाडेवाढीचा निर्णय झालेला नाही. पण टेम्पोमालकांनी भाडेवाढ सुरू झाली आहे.दूरच्या माल वाहतुकीसाठीही अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्टÑ माल वाहतूकदार असोसिएशनचे सचिव दयानंद नाटकर म्हणाले की, १ हजार किमीसाठी ट्रकला साधारण २०० लिटर डिझेल लागते. त्यानुसार लांब पल्ल्याच्या मालवाहतुकीच्या भाड्यात किमान अडीच हजार रुपये वाढ झाली आहे.भाज्या ६० रुपये किलोवरडिझेल दरवाढीमुळे भाज्यांच्या किमती वाढल्या आहेत. मागील महिन्यात बहुतांश भाज्या साधारण ३० रुपये किलो होत्या. महिनाअखेरीस त्या ४० रुपये किलोवर पोहोचल्या, तर आता त्या ६० रुपये किलो झाल्या आहेत. डिझेलचे दर असेच वाढत राहिल्यास किरकोळ ग्राहकांना पाव किलो भाजीसाठी २० रुपयेही मोजावे लागतील. डाळी, साखर, गहू व तांदळाच्या दरातही किलोमागे ५ रुपयांची वाढ झाली आहे.
महागाईने सर्वांचीच होरपळ; अच्छे नव्हे, बुरे दिनचीच चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2018 6:12 AM