अमर शैला -
मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेवेळी कागदपत्रे उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचा उडणारा गोंधळ नव्या वर्षात कमी होणार आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना कोणकोणती कागदपत्रे लागतील, तसेच त्यांचा नमुना कसा असेल, याची माहिती सीईटी सेलकडून प्रवेश परीक्षेचे अर्ज भरतानाच विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. त्यासाठी सीईटी सेलच्या संकेतस्थळावर नवे बदल करण्यात आले आहेत.
सीईटी सेलमार्फत दरवर्षी व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. मात्र, अनेकदा प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे लागतात, याची विद्यार्थ्यांना
माहिती नसते. तसेच विद्यार्थी जातीचे प्रमाणपत्र काढतात, मात्र जात वैधता अथवा नॉन क्रिमिलेअरचे प्रमाणपत्र लागते, याची माहिती त्यांना नसते. त्यातून ऐनवेळी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना घाई करावी लागते अथवा त्यांच्यावर खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेण्याची वेळ येते. तसेच सीईटी सेललाही विद्यार्थ्यांच्या हिताच्यादृष्टीने प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ द्यावी लागते. परिणामी, कॉलेज सुरू करण्याचे वेळापत्रकही कोलमडते. या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती प्रवेश परीक्षेचे अर्ज भरतानाच उपलब्ध करून दिली आहे.
नव्या संकेतस्थळावर प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देणारा रकाना असणार आहे. त्यामध्ये आवश्यक असलेल्या प्रमाणपत्र यांची माहिती त्यात दिसणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची कागदपत्रे गोळा करतानाची धावपळ कमी हाेणार आहे.
विद्यार्थ्यांकडे प्रवेशावेळी एखादे कागदपत्रे नसते. त्यातून विद्यार्थ्यांची गैरसोय होते. त्यामुळे प्रवेश परीक्षेचे अर्ज भरतानाच प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे लागतील, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी संकेतस्थळावर बदल केले आहेत. विद्यार्थी आतापासूनच कागदपत्रे मिळविण्याची तयारी करतील. त्यातून प्रवेश प्रक्रियेवेळी त्यांना ताण येणार नाही. प्रवेश प्रक्रियाही सुरळीत पार पडेल. - दिलीप सरदेसाई, आयुक्त, सीईटी सेल
प्रवर्गनिहाय माहिती दिसणार- प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती देणारा रकाना प्रवेश परीक्षेचे अर्ज भरतानाच विद्यार्थ्यांना संगणकाच्या स्क्रीनवर दिसेल.- यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याने ओबीसी हा प्रवर्ग निवडल्यास त्याला या प्रवर्गातून प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमाणपत्र यांची माहिती त्यात दिसेल. - हे विद्यार्थी हे नमुना प्रमाणपत्र डाऊनलोड करून त्याप्रमाणे प्रमाणपत्र मिळावे, यासाठी सक्षम अधिकाऱ्यांकडे अर्ज करू शकतील.